घरमुंबईमुंबईच्या नालेसफाईचं मुसळ गाळातच! दावे फोल?

मुंबईच्या नालेसफाईचं मुसळ गाळातच! दावे फोल?

Subscribe

मुंबईतील नालेसफाईचे काम यंदा पावसाळ्यापूर्वीच ११३ टक्के झाल्याचा दावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केल्यानंतर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याचा पर्दाफाश केला. मुंबईतील विविध मोठ्या आणि छोट्या नाल्यांमधील लाखो मेट्रीक टन गाळ काढल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात विरेाधी पक्षनेत्यांनी काही माणसांना नाल्यात उतरून काठीने तसेच व्यक्तीश: नाल्यातील तळ शोधण्याचा प्रयत्न केला. सर्व नाल्यांची छायाचित्रे अणि त्यातील गाळाचे प्रमाण याचे पुरावेच आयुक्तांना सादर करत याची पुन्हा नालेसफाई करून घ्यावी आणि संबंधित कंत्राटदारांच्या बिलाची रक्कम न देता त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यंदा नालेसफाई ११३ टक्के झाल्याचा दावा केल्यानंतर विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी २९ आणि ३० जून रोजी मुंबईतील विविध नाल्यांची पाहणी केली. यामध्ये शीवमधील प्रेम नगर नाला, माहिम नाला, कोरबा मिठानगर नाला, वांद्रे खेरवाडी चमडावाडी नाला, गोवंडी शिवाजीनगर नाला, कुर्ला मिठी नदी, घाटकोपर लक्ष्मी नगर नाला, घाटकोपर पूर्व सोमय्या नाला, अंधेरी इंडियन ऑईल नाला, गोरेगाव ओशिवरा नाला, मालाड वळनाई नाला, लिंकींग रोड, कांदिवली पश्चिम लालजी पाडा नाला, बोरीवली गोराई नाला आदी नाल्यांची पाहणी करून गाळाची मोजणी केली. या पाहणीमध्ये नाल्यांमध्ये पाच ते सहा फूट गाळ साचून असल्याचा आरोप पुराव्यांनिशी रवी राजा यांनी केला आहे. तसेच काही नाल्यांची सफाई अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय नाल्यातून काढलेल्या गाळाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात नसल्याचे सांगत राजा यांनी मुंबईत पाऊस पडल्यास नाल्याच्या बाजूला काढलेला गाळ पुन्हा त्याच नाल्यामध्ये जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आयुक्तांना याबाबतचे पत्र आणि निवेदन देत पुन्हा अधिकाऱ्यांना सूचना देऊन सफाईचे काम करून घ्यावे,अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर त्यांचे पैसेही दिले जाऊ नये, अशी सूचना त्यांना केली. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे असत्य असून आतापर्यंत कोणत्याही आयुक्तांनी अशा प्रकारचे केलेले निवेदन चुकीचे आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नालेसफाई झाली असेल तर मी स्वत: केलेल्या पाहणीत आणि आपण प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये तथ्य आढळून आले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या पाहणीत सापडला गाळ

शीवमधील प्रेम नगर नाला : खोली – ५ फूट, गाळ – ३ फूट

- Advertisement -

माहिम नाला : खोली – ५ फूट, गाळ – ३ फूट

कोरबा मिठानगर नाला : खोली – ९ फूट, गाळ – ४फूट

वांद्रे खेरवाडी चमडावाडी नाला : खोली – ६ फूट, गाळ – ४ फूट

गोवंडी शिवाजीनगर नाला : गाळ – ४ फूट

कुर्ला मिठी नदी : खोली – ८ फूट, गाळ – ३ फूट

घाटकोपर लक्ष्मी नगर नाला : खोली – ७ फूट, गाळ – ५ फूट

घाटकोपर पूर्व सोमय्या नाला : खोली – ३.५ फूट, गाळ – २.५ फूट

अंधेरी इंडियन ऑईल नाला : गाळ – ४ फूट

गोरेगाव ओशिवरा नाला : खोली – ८ फूट, गाळ – ५ फूट

मालाड वळनाई नाला, लिंकींग रोड : खोली – १० फूट, गाळ – ८ फूट

कांदिवली पश्चिम लालजी पाडा नाला : खोली – ८ फूट, गाळ – ३ फूट

बोरीवली गोराई नाला : खोली – १७ फूट, गाळ – २ फूट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -