घरमुंबईसत्ता उलथवून टाकण्यास पनवेलचा पाणीप्रश्न कारणीभूत ठरणार

सत्ता उलथवून टाकण्यास पनवेलचा पाणीप्रश्न कारणीभूत ठरणार

Subscribe

१९ जानेवारीला महापालिकेवर मोर्चाचे आयोजन

पाणीप्रश्नाची सामान्यांना बसणारी झळ आणि त्यातून उद्रेक होणार्‍या घटनांमुळे अनेक ठिकाणची सत्तास्थाने उलटवून लावली आहेत. पनवेलच्या सत्ताधार्‍यांचा प्रवास त्या दिशेने होण्याची ठिणगी नुकत्याच झालेल्या पाणीप्रश्नाच्या बैठकीत पडली. प्रशासन शिस्तबद्ध आणि करारी हवे, गोड बोलून तोंडाला पाने पुसणारे नसावे अन्यथा सामान्यांच्या उद्रेकाची त्यांनाही झळ बसेल, असा इशारा देत उपस्थितांनी पनवेलच्या पाणीकपात धोरणाला चांगलाच विरोध केला. त्यानंतर शनिवार, १९ जानेवारी रोजी आंदोलन छेडून सत्ताधारी, त्यांचे भागीदार आणि प्रशासनाला ठोस उपाययोजना राबविण्यास प्रवृत्त करण्याचा अंतिम निर्धार व्यक्त करण्यात आला. त्या आंदोलनाचे नियोजन आणि नागरिकांचा सहभाग याकरिता येत्या पंधरा दिवसात नाका सभा घेऊन जनजागृती करण्याचे या बैठकीत ठरले. सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी पाणीप्रश्नावर हॉटेल पार्क इनमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आज आणि भविष्यातील पनवेलला पाणीटंचाईपासून वाचवण्यासाठी टँकर माफिया, पाणी गळती आणि सत्ताधारी, प्रशासनाची हातमिळवणी यांना सुतासारखे सरळ करण्यासाठी पाणीटंचाईवर थेट आंदोलन छेडण्याचा निर्णय उपस्थितांनी व्यक्त केला. तो सर्वानुमते ठराव करून त्याचे नियोजन करण्याचे ठरले.

डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीला सर्वच राजकीय पक्षाच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांनी कांतीलाल कडू यांचे पाणीप्रश्नावरील धाडस आणि नियोजनाबद्दल कौतुक केले. विशेषतः पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजाच्या जिव्हाळ्याविषयी झगडणारा म्हणून कांतीलाल कडू यांचा गौरव करावा लागेल, अशा आपुलकीच्या शब्दात सर्वच सामाजिक नेत्यांनी आपली अभिव्यक्ती दाखवून दिली. पनवेलकरांना पाण्याचे व्यवस्थित नियोजन होत नसेल तर पहिल्यांदा नगरसेवक आणि अधिकार्‍यांचे पाणी तोडावे लागेल, असा इशारा डॉ. भक्तीकुमार दवे यांनी केला. आंदोलनाची भाषा जर सत्ताधारी आणि प्रशासनाला कळत असेल तर त्याच भाषेत त्यांना समजावण्याची नितांत गरज असल्याचे सांगून डॉ. दवे यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे नरेंद्र जाधव यांनी प्रारंभीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हक्क मिळविण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते. ती शिकवण आपण आत्मसात केलीच आहे, तर आंदोलन करून पाणीप्रश्नावर पनवेलकरांच्या मनामनातील सल आपण बनले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. गेंड्याच्या कातडीचे सत्ताधारी आणि मुजोर प्रशासन कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याने पनवेलकरांनी त्यांना नियोजन शिकवण्यासाठी आंदोलन केले पाहिजे, असे मत मनसेचे शहर अध्यक्ष शितल शिलकर यांनी मांडले.

- Advertisement -

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील पाण्याची अवस्था अतिशय बिकट आहे. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २९ ग्रामपंचायतीतील गावांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. तळोजे पाणीप्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. यासाठी आता एकत्रपणे लढा देऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी व्यक्त केले. नगरसेवकांना दहा हजारांचे मानधन महिन्याला मिळत असल्याने त्यांचे बोट आकाशाला टेकल्याची त्यांची भावना झाल्याने नागरी समस्यांवर ते बोलायला तयार नाहीत. परंतु, अनेक रावांचे रंक आणि रंकांचे राव झाल्याचे आम्ही डोळ्यादेखत पाहिले आहेत. तेव्हा बाबांनो, सबुरीने घ्या. तुम्हाला ज्यांनी निवडून दिलेत त्यांना विसरलेत तर तुम्हाला तेदेखील पायाखाली घेतील, असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष बी. ए. पाटील यांनी दिला. पाणीप्रश्नावरचे प्रशासनाचे नियोजन ढासळले आहे. महापालिका लादण्याची घाई केली. त्यापेक्षा आधी पाणीप्रश्नाचे नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती. त्यातून काही धडा घेणार असाल तर ठीक आहे अन्यथा नागरिकांच्या रोषाला बळी जावे लागेल, असे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -