मुंबईतील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

Order to conduct fire audit of all hospitals in Mumbai
मुंबईतील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश

भांडुप येथील खासगी रुग्णालयास आणि दहिसर येथील कोविड सेंटरमध्ये लागलेल्या आगीचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त इकबाल चहल मुंबई शहर, उपनगरे येथील सर्वच सरकारी, पालिका, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अग्निशमन दलाने येत्या १५ दिवसात याबाबतची कार्यवाही पूर्ण करून त्यासंबंधित अहवाल आयुक्तांना सादर करायचा आहे.

त्यामुळे आता फायर यंत्रणेबाबत गंभीर त्रुटी ठेवणाऱ्या सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये भीषण आग लागल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील सनराईज या खासगी रुग्णालयातील कोरोनाग्रस्त ९ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात दहिसर येथील पालिकेच्या जंबो कोविड सेंटरमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या घटनांचे तीव्र पडसाद पालिका वर्तुळात उमटले होते. त्यामुळेच पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, याची गंभीर दखल घेऊन मुंबई अग्निशमन दलाला मुंबईतील सर्वच सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करून त्याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.