नियम पाळा, नाहीतर मुंबईत नाईट कर्फ्यू; आयुक्तांचा इशारा

bmc commissioner iqbal chahal
मुंबईत नाईट कर्फ्यू; आयुक्तांचा इशारा

काही दिवसांपासून मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील कमी झाली आहे. पण असे असेल तरीही मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईकरांना इशारा दिला आहे. मुंबईत जरी रुग्ण कमी होतोना दिसत असेल तरी कोरोनाचा धोका हा अद्यापही कायम आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संदर्भात नियमाचे पालन केले नाहीतर मुंबईत रात्रीचा कर्फ्यू लावण्यात येईल, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल म्हणाले आहेत.

काय म्हणाले इकबाल चहल?

मुंबईत परवा (मंगळवारी) लोअर परळ येथील ऍपीटोम आणि वांद्रे येथील अन्य एका नाईट क्लबमध्ये रात्री उशीरापर्यंत दोन-अडीच हजार लोक विना मास्क वावरताना आढळून आले. त्यामुळे पालिकेने संबंधित क्लबच्या विरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे. पण लोकांचे अशा प्रकारचे वर्तन सुधारले नाही तर नाईलाजाने रात्रीचा कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबतची मी मागणी केली आहे. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. जर या दिवसात त्यांचे वर्तन सुधारले नाही तर आम्हाला रात्रीचा कर्फ्यू लागू करावा लागले, असे इकबाल चहल म्हणाले.

आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८७ हजार ८९१ इतकी आहे. यापैकी १० हजार ९३५ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ६४ हजार २२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पाहायला गेले तर राज्यात काही दिवसांपासून रिकव्हर होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात काल (बुधवारी) ४ हजार ९८१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ झाली आहे. तसेच काल राज्यात आज ७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४७ हजार ९०२वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ४२ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४५ टक्के एवढे झाले आहे.


हेही वाचा – खुशखबर! सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षात सुरू – चहल