घरमुंबईपूरपरिस्थितीमुळे वैद्यकीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

पूरपरिस्थितीमुळे वैद्यकीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

Subscribe

मुदतवाढ देण्यासंदर्भात आज होणार बैठक

राज्यामध्ये सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांतील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी पोहचणे विद्यार्थ्यांसाठी अशक्य आहे. त्यामुळे बीडीएस व एमबीबीएस अभ्यासक्रमांच्या दुसर्‍या फेरीमध्ये निवड झालेल्यांपैकी तब्बल 1696 विद्यार्थ्यांना बुधवारी शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सीईटी सेलच्या वतीने मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणार्‍या प्राधिकरणाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होऊन मुदतवाढीचे परिपत्रक काढण्यात येण्याची शक्यता आहे.

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दुसरी यादी जाहीर केली आहे. राज्यातील एमबीबीएस प्रवेशासाठी 948, तर बीडीएस प्रवेशासाठी 1 हजार 106 जागा उपलब्ध आहेत. सीईटी सेलकडून नुकतीच या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी जाहीर केली. परंतु, मुंबईसह कोकणात चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दोन दिवस मुदतवाढ दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन 7 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करायचा होता. परंतु कोल्हापूर, सांगली, आणि सातारा भागात पावसाने थैमान मांडल्याने राज्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महामार्ग आणि रेल्वे सेवाही बंद आहे.

- Advertisement -

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर येथील कॉलेज मिळाली आहेत. त्यांना प्रवेश घेण्यासाठी कॉलेजपर्यंत पोहचणे अशक्य झाले आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी सीईटी सेलकडे येत असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. मुदतवाढीला मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव बुधवारी प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वैद्यकीय प्रवेश 18 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहेत. मात्र राज्यभरात असलेली पूरस्थिती लक्षात घेवून मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयास सरकारने विनंती करावी यासंदर्भातील प्रस्तावही प्राधिकरणाच्या वतीने देण्यासंदर्भातील चर्चा बुधवारी बैठकीत होईल अशी माहिती आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

- Advertisement -

सीईटी सेलमध्ये करणार व्यवस्था
मुंबईतील ज्या विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्यामध्ये जाऊन प्रवेश घेणे शक्य होणार नाही. त्यांना सीईटी सेलमध्ये येऊन आपली कागदपत्रे व डीडी जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -