लाखोंना भोवली ओव्हर स्पिडींग

३ कोटी ७१ लाखांचा दंड वसूल

राज्यातील महामार्गावर अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरु असतानाच दुसरीकडे वाहतुकीच्या नियमांना छेद दिल्याच्या घटना वाढत आहेत. ओव्हर स्पिडींग म्हणजेच भरभाव वेगाने धावणार्‍या गाड्यांची संख्या रोज वाढत असल्याचे दिसून आले असून गेल्यावर्षभरात तब्बल १ लाख २१ हजार ५०६ वाहन चालकांविरोधात ओव्हर स्पिडींगची कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या १ लाख वाहकांकडून तब्बल ३ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आहे.

भरधाव वेगात गाडी चालवणे हेही वाढत्या अपघाताचे प्रमुख कारण आहे. राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर वेगाची मर्यादा किती असावी तसेच वेगवेगळी वेग मर्यादा वेगवेगळ्या वाहनांना घालून देण्यात आलेली आहे. यामध्ये छोट्या वाहनांना प्रतितास 100 किलोमीटर, तर प्रवासी बससाठी प्रतितास 80 किलोमीटरची कमाल वेग मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. याचे फलकही लावून सुध्दा आज महामार्गांवर बसेस् आणि गाड्यांकडून सर्रास नियम मोडले जात असल्याची धक्कादायक माहिती दैनिक आपलं महानगरचा हाती लागली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2019 या एका वर्षात वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या तब्बल 1 लाख 21 हजार 506 दोषी वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 3कोटी 71 लाख 70 हजार 550 रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे 2019 साली नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाहन चालकांच्या वेगाला लगाम लागल्याचे दिसते. मात्र त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वेग मर्यादेचे उल्लंघन झाल्याचेही दिसून आले.

3 हजार 148 अपघात
महाराष्ट्रात 34 राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून 17 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. तर राज्यातील 34 राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून विविध सहा राज्ये जोडण्यात आली आहेत. या महामार्गांवर 2019 मध्ये एकूण 33 हजार 148 अपघात झाले आहेत. या अपघातात 12 हजार 277 मृतांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 65 जखमी झाले आहेत. अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे ओव्हर स्पिडींग आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून ओव्हर स्पिडींग करणार्‍या वाहनांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.

इंटरसेप्टर वाहनामुळे कारवाईला गती
महामार्ग पोलिसांना वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाईसाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर गाड्या देण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये स्पीडगन कॅमेरा तसेच ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीन आहे. वाहनांना लावलेल्या काळ्या काचांची तपासणी टीटमीटरच्या मदतीने केली जात आहे. विशेष म्हणजे स्पीडगन कॅमेर्‍यामुळे गाड्यांच्या अतिवेगाला लगाम लागणार असून ३२० किमीचा वेगही हा कॅमेरा पकडू शकतो.त्यामुळे कारवाई जलदगतीने होते, अशी माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात येत आहेत.