घरCORONA UPDATEपालघर मॉब लिंचिंग : ११५पैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह!

पालघर मॉब लिंचिंग : ११५पैकी एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह!

Subscribe

काही दिवसांपूर्वी पालघरच्या सीमेवरच्या आदिवासी भागामध्ये दोन साधूंची साधारणपणे १५० ते २०० लोकांच्या जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ११५ जणांना अटकेत घेतले होते. या सगळ्यांना वाडा, डहाणू, कासा, विक्रमगढ, तलासरी आणि इतर ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता त्यातल्या एका ५५ वर्षांच्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पालघर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांना आता क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यामध्ये २३ जण हे पोलीस कर्मचारी असून २० जण हे या घटनेतील इतर आरोपी आहेत.

कोरोनाग्रस्त सापडलेला ५५ वर्षीय आरोपी हा पालघरच्या डहाणूमधल्या दिव्य-वाकीपाडाचा रहिवासी आहे. त्याला १७ एप्रिल रोजी पोलिसांनी पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाच अटक केली होती. तेव्हापासून त्याला या प्रकरणातील इतर २० आरोपींसोबत वाडा पोलीस स्टेशनमध्ये बंद करण्यात आलं होतं. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २८ एप्रिल रोजी सकाळी संबंधित आरोपीची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. मात्र, तेव्हा ती निगेटिव्ह आली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा ही चाचणी करण्यात आली, तेव्हा मात्र ती पॉझिटिव्ह आली. या आरोपीला सध्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये जेल वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. दरम्यान, या आरोपीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

१६ एप्रिल रोजी पालघरच्या सीमावर्ती भागामध्ये गुजरातकडे जाणाऱ्या दोघा साधूंची जमावाने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. या भागामध्ये लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रीय झाल्याची अफवा पसरली होती. हे दोघेजण चोरच आहेत, या संशयातून जमावाने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण करायला सुरुवात केली. ही मारहाण इतकी निर्घृण होती, की त्यामध्ये या दोघा साधूंचा मृत्यू झाला. पुढच्या २४ तासांमध्ये पोलिसांनी ११५ आरोपींना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -