घरCORONA UPDATECorona: कोरोनाशी लढण्यासाठी पॅरामेडिकलचा निकाल अवघ्या ११ दिवसांत लावला!

Corona: कोरोनाशी लढण्यासाठी पॅरामेडिकलचा निकाल अवघ्या ११ दिवसांत लावला!

Subscribe

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी देशातील प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या लढ्यात सरकारला पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयूएचएस) मॉडर्न मिडलेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्सचा (एमएमएसपीसी) निकाल अवघ्या ११ दिवसांत जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकत नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ३ हजार ३६४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४१४ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे सरकारला ग्रामीण भागात कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध

सध्या देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे एमएमएसपीसी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार मार्चमध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचा निकाल तातडीने लावण्याचे आदेश राज्य सरकारने विद्यापीठाला दिले. उन्हाळी सत्राच्या परीक्षेत राज्यातून तब्बल ३ हजार ३६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये आयुर्वेदाची पदवी घेतलेले २ हजार २९५ तर नर्सिंगची पदवी घेतलेले १ हजार ६९ विद्यार्थी होते. राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा नियंत्रक विभागाने राज्यातील वैद्यकीय कॉलेजांना निकाल लवकर लावायचे असून तातडीने परीक्षेचे साहित्य विद्यापीठाकडे पोस्टाने पाठवण्यास सांगितले. परंतु लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती पोहोचण्यात अडचणी येत आहेत. अशाही परिस्थितीमध्ये विद्यापीठाकडे माहिती पोहचलेल्या १ हजार ४१४ विद्यार्थ्यांचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत परीक्षा नियंत्रक विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल विद्यापीठाच्या www.muhs.edu.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. तर उर्वरित १ हजार
९५० विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.

- Advertisement -

प्राथमिक केंद्रात मिळेल नोकरी

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून मार्च २०१९ पासून एमएमएसपीसी हा अभ्यासक्रम सुरू केला. या अभ्यासक्रमांतर्गत राज्यातील आयुर्वेद आणि नर्सिंग शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेमार्फत जिल्हा रुग्णालयात एमएमएसपीसी अभ्यासक्रमात सहा महिने मॉडर्न मेडिसिन म्हणजेच अॅलोपथीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून दर सहा महिन्यांनी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना ग्रामीण भागात हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणजेच प्राथमिक केंद्रांमध्ये नोकरी मिळते.

एमएमएसपीसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार असल्याने निकाल लावण्याचे आदेश सरकारकडून आले. त्यानंतर कुलगुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही अवघ्या ११ दिवसांत निकाल जाहीर करू शकलो.

डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, एमयूएचएस

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -