LockDown: ‘या’ काळात मध्य रेल्वेने सोडवल्या प्रवाशांच्या समस्या

कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे जागतिक पातळीवरील संकट काळात भारतीय रेल्वे सक्रिय भूमिका पार पाडत आहे. मध्य रेल्वेच्या सामान्य प्रशासना अंतर्गत असलेल्या सार्वजनिक तक्रार कक्षाने प्रवाशांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात उल्लेखनीय कामगिरी दर्शविली आहे. लॉकडाऊनच्या काळात रेल्वेकडे अनेक सूचना, मागण्या आणि तक्रारी आल्या आहेत. हे “रेल मदद” आणि “सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रिव्हेनेसेस रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टम” द्वारे प्राप्त झाले. मध्य रेल्वेच्या पब्लिक ग्रिव्हेनेसेस सेलने अशा उद्भवलेल्या बाबींवर तातडीने कारवाई केली. या माध्यमातून सामान्य लोक, प्रवासी, कर्मचारी आणि भागधारकांनी समस्या मांडल्या असून त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल कौतुक करत आभार मानले आहेत. या संबंधीचे प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वेने जारी केले आहे.

९३ टक्के प्रकरणांचे निराकरण 

मध्य रेल्वेकडे “रेल मदद” च्या माध्यमातून २३ मार्च १८ जूनपर्यंत ९१० प्रवाशांच्या विविध तक्रारी आल्या. १८ जुन्या तक्रारींसह प्रत्येक प्रकरणात त्वरित कारवाई करण्यात आली असून एकूण ९२३ तक्रारींचे निराकरण रेल्वेने केले आहे. याच काळात “केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली” च्या माध्यमातून प्रवाशांच्या ४१२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार सेलने जुन्या १४८ तक्रारींसह प्राप्त नव्या तक्रारींवर त्वरित कारवाई केली. तसेच ९३.२१ टक्के म्हणजेच एकूण ५६० पैकी ५२२ प्रकरणांचे निराकरण केले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रवाशांनी मानले आभार 

दरम्यान, प्रवाशांनी याबाबत प्रतिसाद देत वरुण डंबल यांनी ईमेल पाठवून रेल्वेमार्गाद्वारे मालवाहतूक करून अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस मदत करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोविड बाधितांसाठी रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तर देवांश गुप्ता यांनीही तिकीटाच्या परताव्यासाठी त्वरित दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.

हेही वाचा –

लडाखमध्ये घुसखोरी झालेली नाही, भारताचं सैन्य सक्षम – नरेंद्र मोदी