घरताज्या घडामोडीमुंबईच्या ५३ रेल्वे स्थानकांवर मंगळवारपासून पास मिळणार, ऑफलाईन पद्धत पालिकेकडून जाहीर

मुंबईच्या ५३ रेल्वे स्थानकांवर मंगळवारपासून पास मिळणार, ऑफलाईन पद्धत पालिकेकडून जाहीर

Subscribe

रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळील मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील

मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Passes will be available at 53 railway stations in Mumbai from 15 August, offline system announced by Mumbai BMC)  त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया बुधवार, ११ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर करण्यात येणार आहे. तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे.  त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

ज्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होत होती. त्याची दखल घेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केला आहे. कोविड लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल रेल्वे प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अँपद्वारे तसेच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अँप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालावधीत सुरु होईल. तत्पूर्वी ११ ऑगस्ट २०२१ पासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होवू नये, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

- Advertisement -

रेल्वे मासिक प्रवास पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी निरंतर सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असे आवाहन करुन ही रेल्वे पास देण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी असेल, याविषयी मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे.

रेल्वे पास देण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल

  • बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ५३ उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा देखील समावेश आहे. या सर्व स्थानकांवर मिळून तिकिट खिडकी नजीक ३५८ मदत कक्ष असतील.
  • मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) एकूण १०९ लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध असेल.
  • ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत (हार्ड कॉपी), त्यासोबत छायाचित्र ओळखपत्र पुरावा असे दोन्ही दस्तावेज सोबत घेवून घरानजीकच्या रेल्वे स्थानकावर जावे. हे दोन्ही किंवा यातील एक कागदपत्रं जरी नसेल, तरी रेल्वे स्थानकावर, रेल्वे प्रशासनाकडून प्रवेश नाकारण्यात येईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
  • रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीजवळील मदत कक्ष सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा सलग दोन सत्रांमध्ये सुरु राहतील
  • मदत कक्षावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी (किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी) हे संबंधित नागरिकाच्या कोविड लसीकरण अंतिम प्रमाणपत्राची (फायनल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट – दुसरा डोस) वैधता कोविन ऍपवर तपासतील. तसेच छायाचित्र ओळखपत्र पुरावादेखील तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रं वैध असल्याचे निश्चित झाल्यानंतर, कोविड प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्याच्या प्रतीवर देखील विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल.
  • सदर शिक्का मारलेले कोविड अंतिम प्रमाणपत्र रेल्वे स्थानकावरील तिकिट खिडकीवर सादर करावे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकडून मासिक रेल्वे प्रवास पास देण्यात येईल. मात्र, सदर पास आधारीत प्रवासाची सुविधा ही १५ ऑगस्ट २०२१ पासूनच वैध असेल. त्यापूर्वी नाही.
  • कोविड लसीचा एकही डोस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतला असल्याच, अशा नागरिकांना सद्यस्थितीत उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा नसेल.
  • जर कोणीही बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला, तर अशा व्यक्तिंविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा / आपत्कालीन व्यवस्थापन कायदा / भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर पोलीस कार्यवाही करण्यात येईल.
  • अत्यावश्यक सेवेतील शासकीय / निमशासकीय आणि इतर कर्मचारी यांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच, म्हणजेच कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असोत वा नसोत, त्यांना रेल्वे प्रवासाची मुभा सुरू राहील.
  • मुंबई महानगर प्रदेशातील इतर सर्व महानगरपालिका / नगरपरिषद / स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही याचप्रकारे उद्यापासून व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील रहिवाशांनी नजीकच्या रेल्वे स्थानकावर जावून वैध प्रक्रिया पार पाडावी.

ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर, मासिक पास प्राप्त करणे अतिशय सुलभ होणार आहे. ती व्यवस्था देखील पुढील आदेश येईपर्यंत सुरु राहील. या संपूर्ण प्रक्रियेची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) देखील नेमले असून त्यांच्यासह आवश्यक कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या या व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील कोविड निर्बंध शिथिलतेवर ८ दिवसात निर्णय- पालकमंत्री

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -