घरताज्या घडामोडीभिवंडी: गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ एका वर्षासाठी थांबवली

भिवंडी: गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ एका वर्षासाठी थांबवली

Subscribe

भिवंडी महानगर पालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या २० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान पालिकेच्या आस्थापन विभाग सांभाळणाऱ्या मुख्यालय उपायुक्त नूतन खाडे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार कामावर गैरहजर असल्याने त्यांची एका वर्षासाठी पगारवाढ थांबवल्याची घटना समोर आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून कर्मचारी संघटना आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा तयारीत आहेत. या कारवाई झालेल्यांमध्ये पाच कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा सुध्दा समावेश असल्याचे बोलले जात आहे .

भिवंडी पालिकेच्या उपायुक्त, नगर रचना विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी, टाटा आमंत्रण येथील कार्यरत असलेले कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यासोबत आस्थापन विभाग, वाहन विभागामधील तब्बल २० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर स्वच्छता विभाग व नगर रचना विभागातील असे दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने जीव घेतला, असे असताना ही पालिका प्रशासनाने महापालिका मुख्यालय व संबंधित विभाग हे प्रतिबंधित न करता तेथे कोणतीही औषध फवारणी न केल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे, असे असताना पालिका उपायुक्त नूतन खाडे यांनी पालिकेच्या शिस्त भंग प्राधिकरण अधिकारी असलेल्या आयुक्तांच्या आदेशानुसार कामावर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची एका वर्षासाठी पगारवाढ थांबविण्याची शिक्षा केली आहे. त्यामुळे सध्या कर्मचारी कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून कोरोना विरोधातील लढ्यात जीवाची पर्वा न करता कामगार दिवसरात्र मेहनत करीत असताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याऐवजी कारवाई करणे म्हणजे सूड उगविला जात असल्याची तक्रार कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी बोलून दाखविली. तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने याविरोधात लवकरच राज्याचे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पगारवाढ रोखण्याची शिक्षा केलेल्यांमध्ये पाच कोरोना बाधित कर्मचाऱ्यांचा सुध्दा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -