घरमुंबईपोटातून काढले पेन, पेन्सिल, नारळाच्या झावळ्या !

पोटातून काढले पेन, पेन्सिल, नारळाच्या झावळ्या !

Subscribe

पोटात दुखते अशी तक्रार घेऊन जेव्हा एखादा माणूस डॉक्टरांकडे येेतो आणि काही केल्या बरे वाटत नाही, या स्थितीला पोहोचतो आणि डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात, तेव्हा काही वेळा अशा गोष्टी त्यांच्या पोटात सापडतात की, सगळ्यांना चक्रावून जायची वेळ येते.

पोटात दुखते अशी तक्रार घेऊन जेव्हा एखादा माणूस डॉक्टरांकडे येेतो आणि काही केल्या बरे वाटत नाही, या स्थितीला पोहोचतो आणि डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात, तेव्हा काही वेळा अशा गोष्टी त्यांच्या पोटात सापडतात की, सगळ्यांना चक्रावून जायची वेळ येते. पोटात प्रचंड दुखत असल्याने 19 जुलैला बुलढाणामधील खामगाव येथील एक तरुण जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.

डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या पोटात काहीतरी वेगळे असल्याचे आढळल्याने त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाच्या पोटात डॉक्टराना पेन, पट्टी, पेन्सिल व नारळाच्या झावळ्या असा ट्रे भरून कचरा सापडला. ही शस्त्रक्रिया वेळेत करण्यात आल्याने या तरुणाचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती आता चांगली आहे.
बुलढाणा येथील खामगाव येथे राहणारा परमेश्वर बसीरे (वय 20) हा मानसिक तणावाखाली वावरत असल्याने त्याच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

सात दिवसांपूर्वी तो घरातून अचानक दोन दिवस गायब झाला होता. त्यानंतर तो घरी आल्यानंतर सारखा पोटात दुखत असल्याचे घरातील लोकांना सांगू लागला. तसेच दोन ते तीन दिवसांपासून त्याला शौचाला होत नव्हते, ताप येत होता आणि पोटात दुखत होते. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी बुधवारी त्याला अकोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. जे.जे. हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेऊन अकोला सिव्हिलमध्ये कार्यरत असलेले डॉ. संजीत संत यांनी परमेश्वरची तपासणी करून त्याला तातडीने मुंबईला जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांनी त्याला गुरुवारी सकाळी जे.जे. रुग्णालयात आणले

जे.जे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी डॉक्टर संजीत संत याच्याशी चर्चा करून तातडीने परमेश्वरचे एक्स-रे आणि सीटी स्कॅन केले. यामध्ये त्याच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट प्रमुख डॉ. शिरीष भागवत यांच्या सल्ल्यानुसार डॉ. जळबाजी मोरे, डॉ. अमेय तिबुडे, डॉ. विनय प्रसाद आणि डॉ. गुरप्रित सिंग यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

शस्त्रक्रियेनंतर परमेश्वरच्या पोटातून डॉक्टरांनी पेन, पेन्सिल, लोखंडी पट्टी, दगड, स्पंज, नारळाच्या झावळ्या असा कचरा त्याच्या मोठ्या आतड्यातून बाहेर काढला. हा कचरा अन्ननलिकेतून जठर, छोटी आतडी असा जवळपास पाच मीटरचे अंतर पार करून मोठ्या आतड्यात जमा झाला होता. या कचर्‍यामुळे त्याचे मोठे आतडे फाटले होते. तातडीने शस्त्रक्रिया केल्यामुळे परमेश्वरचा जीव वाचवता आला, असे डॉ. जळबाजी मोरे यांनी सांगितले.

शस्त्रक्रियेनंतर परमेश्वरला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्याच्या पोटाला 18 टाके पडले आहेत. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच घरी सोडण्यात येईल. – डॉ. जळबाजी मोरे.

 

परमेश्वर हा मानसिक रुग्ण आहे. तो आठवड्यापूर्वी दोन दिवस घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर परतल्यानंतरच त्याच्या पोटात दुखू लागले. घराबाहेर असताना त्याला काही खायाला मिळले नसल्यामुळे त्याने या वस्तू खाल्ल्या असण्याची शक्यता आहे. वेळेवर शस्त्रक्रिया झाल्याने परमेश्वरचे प्राण वाचवण्यात यश आले.

– डॉ. अजय भंडरवार, विभाग प्रमुख, जनरल सर्जरी.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -