घरठाणेवीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना मारहाण, एकाचा मृत्यू

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना मारहाण, एकाचा मृत्यू

Subscribe

थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शन यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पॉवरच्या कर्मचार्‍यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाणीत टोरंट पॉवरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाऊंड येथे घडली. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तुकाराम पवार (वय 55 वर्षे, रा. काटेमानीवली कल्याण) असे जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या टोरंट पॉवर कर्मचार्‍याचे नाव असून ते टोरंट पावरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी काटई गावातील घरत कंपाऊंड येथे वीज चोरी व थकीत वीज मीटरवर कारवाई करण्यासाठी टोरंट पॉवरचे कर्मचारी गेले असता येथील स्थानिक नागरिकांनी टोरंटच्या या कारवाईस विरोध केला व कर्मचार्‍यांना आधी शिवीगाळ आणि नंतर धक्काबुक्की, मारहाण केली . या मारहाणीत टोरंटचे सुरक्षा रक्षक तुकाराम पवार यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

दरम्यान मयत तुकाराम पवार यांची मुले आकाश पवार व प्रकाश पवार या दोन्ही मुलांनी दोषींवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई मिळावी. तसेच टोरंट पॉवर प्रत्येक कारवाई दरम्यान मोठा पोलीस फाटा घेऊन जात असत. मात्र, आजच्या कारवाई वेळी असे कोणतेही पोलीस संरक्षण का घेतले नाही. त्यामुळे टोरंट पॉवर देखील या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप पवार यांच्या दोन्ही मुलांनी केला आहे. तर टोरंट पॉवर नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांची काळजी घेत असते. ही दुर्दैवी घटना असून नागरिकांना जर काही अडचण किंवा शंका असेल तर त्यांनी कार्यालयात यावे. अशा प्रकारे कर्मचार्‍यांना मारहाण करणे चुकीचे आहे. याप्रकरणी टोरंट पॉवरतर्फे निजामपुरा पोलीस ठाण्यात टोरंटच्या वतीने मारहाण करणार्‍या इसमाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर संबंधितांवर पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -