पोलिसाच्या पोराचा फिल्मी राडा, पोलिसालाच मारहाण

युवकाच्या तावडीतून तरूणीला वाचवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच, त्या युवकाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला.

भररस्त्यात एका तरुणीला मारहाण करत असलेल्या युवकाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच, त्या युवकाने मारहाण केली. बुधवारी रात्री उशीरा कल्याण पश्चिम येथे हा धक्कादायक प्रकार घडला. तरुणीला सोडवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी या घटनेमध्ये चांगलेच जखमी झाले. युवकाने केलेल्या मारहाणीत या अधिकाऱ्याचा गणवेश देखील फाटला. दरम्यान अभिजित शिंदे (२७) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून, त्याचे वडीलही मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी आहे. या तरुणाने आपल्या वडिलांच्या नावाचा धाक दाखवतच त्या पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली. बदलापुरमध्ये राहणारा अभिजित हा बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकाच्या परिसरात असताना, त्याने त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला लथा-बुक्क्याने मारायला सुरुवात केली. हा प्रकार  पाहून त्या परिसरात पानटपरी चालवणारे लोबो यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब यांना याविषयी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी खातीब यांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि त्या तरुणीला वाचवण्यासाठी ते पुढे सरसावले.


वाचा: केईएम रुग्णालयामध्ये अपघात, ३ जण जखमी

मात्र, त्यावेळी अभिजीतने त्यांना ‘माझे वडील पोलीस अधिकारी आहेत, तुमच्या खांद्यावर जेवढे स्टार नाहीत, त्यापेक्षा माझ्या वडिलांच्या खांद्यावर स्टार आहेत. त्यामुळे तुम्ही मला हात लावू नका. ती माझी मैत्रिण आहे, मी तिला काही करेन’, अशा शब्दांत धमकी वजा समज दिली. पोलीस अधिकारी खातीब यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत खातीब यांचा गणवेश फाटला तसंच त्यांना दुखापतही झाली. अखेर अन्य काही पोलीस त्याठिकाणी आले आणि त्यांनी खातीब यांची तरूणाच्या तावडीतून सुटका केली. यानंतर पोलिसांनी अभिजितला पोलीस व्हॅनमध्ये कोंबुन थेट महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आणले. अभिजितचे वडील मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक या पदावर असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली. दरम्यान महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी अभिजीत विरोधात गुन्हा दाखल केला असून, हा प्रकार झाला त्यावेळी तो नशेत असावा अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.


धक्कादायक: रुग्णाला दिला ‘मानव चलित’ व्हेंटिलेटर