राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Raj Thackeray's security has been beefed up

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील विविध मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा आणि मशिदींवरील भोंग्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य करुन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात कलम 153,कलम 116, आणि 117 अंतर्गत गुन्हांची नोंद केला आहे. राज ठाकरेंच्या हनुमान चालीसेबाबतच्या वक्तव्याने समाजातील सर्व स्तरावर शांतता भंग झाली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणार्‍या, प्रक्षोभक भाषणे करणार्‍या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तूर्तास बंदी घालण्याची मागणी याचिकेत केली आहे.

राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील भाषणात 4 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे काढा, अन्यथा परिणामांना सोमोरे जा, असे चिथावणीखोर वक्तव्य करत मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा हा राज ठाकरे यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत, त्यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी याचिकेतून करण्यात आली आहेत.