हितेंद्र ठाकूर आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा, पण…

ncp sharad pawar reaction on rajyasabha election

राज्यसभेच्या निवडणूकीबाबत माझा निर्णय 10 तारखेलाच हितेंद्र ठाकूर अनेक दिवसांपासून म्हणत आहेत. त्यामुळे आघाडी आणि भाजप नेत्यांकडून ठाकूर यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकूश काकडे यांच्या मोबाईलवरून ही चर्चा झाली आहे. मात्र, शरद पवार यांच्या फोननंतरही माझा निर्णय 10 जूनला, अशी भूमिका ठाकूर यांनी मांडली आहे.

अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे दिलासा –

राज्यसभा निवडणुकीसाठी सहा जागा आहेत. मात्र, राज्यसभेसाठी सात उमेदवार रिंगनात आहेत. सहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. शिवसेनेकडून संजय पवार लढत आहेत, तर भाजपकडून धनंजय महाडिक मैदानात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे अशा बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कालच महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. मात्र, तरीही मित्र पक्षातील नाराजी अजून दूर होताना दिसत नाही. दुसरीकडे अपक्ष आमदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याने आता महाविकास आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे.

हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीला मत देण्यास अनुकूल –

आज शरद पवार आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हितेंद्र ठाकूर आघाडीच्या उमेदवाराला मत देण्यास अनुकूल असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, याबाबत अधिकृत माहिती दोन्ही बाजूंनी देण्यात आलेली नाही. ठाकूर यांच्या पक्षाची 3 मते जोडली गेल्यास महाविकास आघाडी समोरची मोठी अडचण दूर होणार आहे. भाजप नेत्यांनीही ठाकूर यांच्या पाठिंब्यासाठी त्यांची भेट घेणे सुरू केले आहे. खुद्द धनंजय महाडिक यांनी ठाकूर यांची भेट घेतली आहे.