घरताज्या घडामोडीकोस्टल रोडअंतर्गत अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे उभारले जाणार पुलाचे खांब

कोस्टल रोडअंतर्गत अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे उभारले जाणार पुलाचे खांब

Subscribe

कोस्टल रोड अंतर्गत १७६ एकल स्तंभांवर उभारला जाणार पूल

देशातील पहिल्या ‘कोस्टल रोड’ चे काम मुंबईत प्रगतीपथावर आहे. या ‘कोस्टल रोड’ च्या कामाअंतर्गत पूल उभारण्यासाठी १७६ एकल स्तंभांचा आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ‘कोस्टल रोड’मुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, कोस्टल रोडमुळे प्रवास सुखकर व जलद होण्यास मदत होणार आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘एकल स्तंभ’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन सागरी किनारा मार्गाचा भाग असणा-या पुलांखाली १७६ खांबांची उभारणी केली जाणार आहे. या दृष्टीने सुरुवातीला ३ चाचणी स्तंभांची उभारणी एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात येणार आहे.याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री युरोपातून आणण्यात आली आहे.

यासंदर्भातील माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणा-या सागरी किनारा मार्गांतर्गत साधारणपणे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण लांबी १५.६६ किलोमीटर लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणा-या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणतः ४ स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ पद्धतीमध्ये त्या ऐवजी खालपासून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो.

- Advertisement -

७०४ ऐवजी १७६ एकल स्तंभ

परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ देखील अधिक लागू शकला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या ७०४ वरुन १७६ इतकी कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसेच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य होणार आहे

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणा-या १७६ स्तंभांचा व्यास हा प्रत्येकी २.५ मीटर, ३ मीटर व ३.५ मीटर अशा ३ प्रकारच्या आकारात असणार आहे. प्रत्येक ठिकाणची गरज शास्त्रीय पद्धतीने तपासून त्या-त्या ठिकाणच्या गरजेनुसार स्तंभांचा आकार निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार या स्तंभांची उभारणी केली जाणार आहे. एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार असल्याने प्रत्यक्ष बांधकामापूर्वी ३ चाचणी स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे ३ चाचणी स्तंभ अनुक्रमे २.५ मीटर, ३ मीटर, आणि ३.५ मीटर या व्यासाचे असणार आहेत. तर या स्तंभांची जमिनीखालील व जमिनीवरील एकूण उंची ही सुमारे १८ मीटर इतकी असणार आहे.

- Advertisement -

वरळी परिसरातील अब्दुल गफार खान मार्गावर असणा-या बिंदू माधव ठाकरे चौकानजिकच्या सागरी किनारा मार्गाच्या जागेत या स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे. साधारणपणे जुलै अखेरपर्यंत या स्तंभांची उभारणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार उभारण्यात आलेल्या चाचणी स्तंभांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या व आडव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे स्तंभांची भार वहन क्षमता व धक्के सहन करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.


हेही वाचा – खाकी वर्दीला सलाम! आत्महत्या करण्यास निघालेल्या विवाहितेचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -