राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

Raj Thackeray

“पुढच्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिरच्या मुद्दयांवर दंगली घडविण्यासाठी ओवेसी सारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक लढवायची आहे.”, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील आयोजित केलेल्या महोत्सवात केला आहे. सरकारकडे दाखवण्यासाठी काहीही राहिलेले नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याकडे यांचा कल दिसत आहे. राम मंदिर व्हायला पाहीजे का? तर नक्कीच झाले पाहीजे. पण ते निवडणुकीनंतर. पण राम मंदिराचा वापर लोकांच्या भावना भडकवण्यासाठी केला जात असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही जोरदार टीका केली. “हनुमान दलित होता, याचा साक्षात्कार योगी आदित्यनाथांना आताच कसा झाला? याआधी राम किंवा हनुमानाची जात कुणीही काढली नव्हती किंवा तसा विचारही केला नव्हता. योगी आदित्यनाथ ओवेसी बद्दल जे काही बोलले ते दंगलीची सुरुवात आहे. लोकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे.”, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

“देशात सध्या जे राजकारण सुरु आहे, त्यावरून लोकांनीच सतर्क व्हायला हवे. हा देश आणि राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकांनीच काळजी घेऊन कुणाच्याही भडकाऊ वक्तव्यावर विश्वास ठेवू नये. तसेच पोलिसांनीही सतर्क राहून अशा लोकांवर कारवाई केली पाहीजे. तरिही कुणी वेडं-वाकडं करण्याचा प्रयत्न केला तर मी आहेच.”, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.