घरमुंबईठाण्यात प्लास्टिक बंदीसाठी महाश्रमदान

ठाण्यात प्लास्टिक बंदीसाठी महाश्रमदान

Subscribe

2 ऑक्टोबर रोजी साजरा होणार स्वच्छ भारत दिवस

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठीकठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी महाश्रमदान करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या उपस्थितीत भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान लोनाड येथील शाळेत सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजेबल मशीन बसवण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे. तसेच सोनखत उपसा व एक खड्डा शौचालयाचे दोन खड्डा शौचालयात रूपांतर करणार्‍या लाभार्थांच्या सत्कार सोहळा आणि शाळेतील मुलांची स्वच्छता दिंडी काढण्यात येणार आहे. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.

- Advertisement -

हा उपक्रम जिल्ह्यातील कल्याण,अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर या पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय अधिकार्‍यांची प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नेमण्यात आलेले अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये जावून महाश्रमदानात सहभागी होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -