घरCORONA UPDATEपीएम फंडातून दिलेले ४०० व्हेंटिलेटर्स धुळखात पडून!

पीएम फंडातून दिलेले ४०० व्हेंटिलेटर्स धुळखात पडून!

Subscribe

मुंबईतील जनतेचे प्राण वाचावेत म्हणून पीएम केअर फंडमधून (PM Care Fund) मुंबई महापालिकेला ४०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु हे सर्व व्हेंटिलेटर्स महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये धुळखात पडून असल्याचा गौप्यस्फोट महापालिकेतील भाजप पक्षाने केला आहे.

कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाल्यापासून मुंबईत व्हेंटीलेटर्स अभावी रुग्ण तडफडून मरत आहेत. महापालिकेच्या विविध रुग्णालयांसह खासगी रुग्णालय आणि उपचार केंद्रांमध्ये खाटाही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत होता. परंतु आता रुग्णालय आणि उपचार केंद्रात खाटांची सुविधा असली तरी व्हेंटीलेटर्सची सुविधा मात्र नाही. महापालिकेने कोविड उपचार केंद्रातील अनेक खाटा ऑक्सिजन रुपांतरीत केल्या आहेत. परंतु ऑक्सिजनची सुविधा असली तरी ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या आणि चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांना व्हेंटीलेटर्सची सेवा आवश्यक असते. परंतु सध्या व्हेंटीलेटर्स (Ventilators) अभावी मोठ्या समस्येला मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला रुग्णालय आणि कोविड उपचार केंद्रांमध्ये व्हेंटीलेटर्सची सुविधा नसतानाच दुसरीकडे पंतप्रधान केअर फंडातून महापालिकेला ४०० व्हेंटीलेटर्स दिले असून हे सर्व व्हेंटीलेटर्स धुळखात पडले असल्याचा आरोप भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांमध्ये हे व्हेंटीलेटर्स एक महिन्यापूर्वी महापालिकेला प्राप्त झाल्याचे म्हटले आहेत. परंतु या व्हेंटीलेटर्सची सुविधा आवश्यक असतानाही ही सर्व सामुग्री विविध रुग्णालयांमध्ये धुळखात पडलेली आहे. एकाही रुग्णालयात व्हेंटीलेटर्सची सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. परिणामी बाधित रुग्ण तडफडून मरत आहेत. याला जबाबदार कोण? महापालिका आयुक्त, प्रशासन की सत्ताधारी पक्ष? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे याचे उत्तर या प्रशासनासह सत्ताधारी पक्षाने द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

व्हेंटिलेटर आवश्यकतेनुसार कार्यान्वीत
मुंबई पालिकेला आतापर्यंत केंद्र सरकारकडून ४४६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. पीएम केअर फंडातून हे व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने मिळाले आहेत. मुंबई पालिकेच्या विविध रुग्णालयांत आवश्यकतेनुसार हे व्हेंटिलेटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत, असा खुलासा मुंबई महानगरपालिकेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -