पुन्हा एकदा मयुरने दाखवले माणुसकीचे दर्शन! ५० हजार रक्कमेतील निम्मी रक्कम त्या अंधमातेला

Pointer Mayur Shelke once again helped the mother of the rescued child
पुन्हा एकदा मयुरने दाखवले माणुसकीचे दर्शन! ५० हजार रक्कमेतील निम्मी रक्कम त्या अंधमातेला

वांगणी रेल्वे स्थानकावर आपला जीव धोक्यात घालून अंधमातेच्या एका ६ वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवून मयूर शेळके या रेल्वेच्या पॉइंटमनने आपल्या शौर्याचे दर्शन घडवले होते. मात्र, आता त्यापुढे पाऊल टाकताना या साहसी मयूरने रेल्वे विभागाकडून बक्षीस स्वरुपात मिळणाऱ्या ५० हजार रक्कमेतील निम्मी रक्कम त्या अंधमातेला देण्याचे जाहीर केले आहे. “पैशांची जितकी गरज मला आहे, तितकीच गरज त्या चिमुकल्या बालकाला देखील आहे. याचा विचार करुन बचावलेल्या त्या बालकाच्या पुढील शिक्षणासाठी म्हणून मी बक्षिसातील अर्धे रक्कम देत आहे.” असे जाहीर करुन मयूरने आपल्यातील माणूसकीचेही दर्शन घडविले.

मयूरच्या शौर्याने महाराष्ट्रातील जनता तर भारावली आहे, मात्र आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवून तो आता तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. खास बात म्हणजे मयूरने केलेल्या कर्तृत्वाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करत प्रशंशा केली. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही कल्पनेपलिकडेचे काम केले आहे.” अशा शब्दांत शाबासकी दिली. तसेच देशाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करुन कौतुक केले.
आजच्या तरुणांनी मयुरचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त करत समाजसेवी उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही कौतुक केले आहे. दुसरीकडे जावा कंपनीचे मालक अनुपम थरेजा यांनी मयुरला समाजापुढे आदर्श उदाहरण ठेवल्याबद्दल जावा कंपनीची दुचाकी भेट म्हणून दिली आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तळवडे गावातील रहिवाशी असलेला रेल्वे कर्मचारी मयूर शेळकेचा गुरुवारी तहसिल कार्यालयात सत्कार करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, मयूरचे आई-वडील, प्रांंत अधिकारी वैशाली परदेशी, तहसिलदार विक्रम देशमुख उपस्थित होते.

वांगणी या मध्य रेल्वे स्थानकावर पॉइंटमन म्हणून मयूर शेळकेकाम करत आहे. १७ एप्रिल रोजी एक अंध स्त्री आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून जात असताना अचानक तिच्या मुलाचा हात सुटून तो रेल्वे ट्रॅकवर पडला. मात्र क्षणाचाही विलंब न लावता मयूरने धाव घेत मुलाला प्लॅटफॉर्मवर ठेवले आणि स्वतःही उडी मारत तो प्लॅटफॉर्मवर आला. काही सेकंदात तिथे पॅसेंजर ट्रेन येत असल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला होता. सेकंदाचा वेळ गेला असता तरी त्या मुलासह स्वतःचाही जीव मयूर गमावून बसला असता.

‘शौर्यचा चेहरा डोळ्यासमोर आला!’

“मी अंधमातेच्या मुलाला ट्रकवर पडताना आणि उद्यान एक्सप्रेस भरधाव वेगाने येताना एकाच वेळी पाहिले होते. त्या बालकापासून मी शंभर ते दिडशे मीटर उभा होतो. त्या मुलाला पडत असताना मला माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा शौर्यचा चेहरा समोर आल्याने काही कळायच्या आतच सर्व बळ एकवटून मी त्या मुलाला वाचवण्यासाठी धावलो. मी त्या चिमुरड्याचे प्राण वाचवू शकलो हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण आहे”, अशी प्रतिक्रिया मयूर शेळकेने व्यक्त केली.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: कोरोनाचा कहर कायम! राज्यात २४ तासांत ६७ हजार रुग्णवाढ, ५६८ जणांचा मृत्यू