घरमुंबईनाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई; २४ गस्ती पथके तयार

नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई; २४ गस्ती पथके तयार

Subscribe

मुंबईमध्ये नाल्यामध्ये मोठ्याप्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे पावसाळ्यात नाले तुंबतात आणि ठिकठिकाणी पाणी साचते. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांविरोधात पालिकेने ठोस पाऊल उचलले असून यापुढे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांना आधी समज देण्यात येईल आणि नंतर त्या भागाचे पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या आयुक्तांनी आता त्यापुढे जात कडक पाऊल उचलले आहे. नाल्यांच्या लगतचा परिसर, रेल्वे स्टेशन लगतची गर्दीची ठिकाणी, रेल्वे ट्रॅक लगतचा परिसर, झोपडपट्टी परिसर इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१’ नुसार तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने २४ विभागात प्रत्येकी एक गस्ती पथक तयार करण्यात आले आहे. या पथकांमध्ये समावेश असणा-या कर्मचा-यांना याबाबतचे प्रशिक्षण परिमंडळनिहाय देण्यात येत आहे.

२४ गस्ती पथके तयार

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील स्वच्छता विषयक परिस्थिती अधिकाधिक चांगली होण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीसांच्या स्तरावर सुसमन्वय साधून कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांसाठी २४ गस्ती पथके (उपद्रव शोध पथक) तयार करण्यात आली आहेत. तसेच याकरिता घनकचरा व्यवस्थापन खात्यातील विशेष कार्याधिकारी (ओएसडी सुभाष दळवी यांना समन्वय विषयक दायित्व सोपविण्यात आले आहे. तर मुंबई पोलिसांच्या वतीने ‘समन्वय अधिकारी’ (नोडल ऑफिसर) म्हणून मुंबई पोलीस दलाचे उपायुक्त (ऑपरेशन) यांची नेमणूक करण्यात आली, असल्याची माहिती सहआयुक्त अशोक खैरे यांनी दिली

- Advertisement -

कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर तयार करण्यात आलेल्या गस्ती पथकांमध्ये प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, अनुज्ञापन निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अभियंता परिरक्षण यांचे प्रतिनिधी, वसाहत अधिकारी, दुकाने व आस्थापना निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे. विभागस्तरीय पथकांमध्ये मुंबई पोलीसांच्या प्रतिनिधींचा देखील समावेश असणार आहे. या पथकांद्वारे विभाग कार्यक्षेत्रातील नाल्यांच्या लगतचा परिसर, रेल्वे स्टेशन लगतची गर्दीची ठिकाणी, रेल्वे ट्रॅक लगतचा परिसर, झोपडपट्टी परिसर इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे गस्त घालण्यात येणार आहे. या दरम्यान नाल्यांमध्ये कचरा टाकणा-या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणा-या व्यक्ती इत्यादींवर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१’ अंतर्गत कलम ११५ व ११६ नुसार तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

पोलीस वसाहतीत खतनिर्मिती

त्याचबरोबर मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींमध्ये कचरा विलगीकरण व कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याची कार्यवाही होत असल्याची खातरजमा मुंबई पोलीसांच्या स्तरावर केली जाणार आहे. या कार्यवाहीसाठी आवश्यकतेनुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याची व राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची मदत घेतली जाणार आहे, अशीही माहिती खैरे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -