मुंबई महापालिकेच ऑपरेशन खटारा

मुंबईत पोलीस आणि महापालिका हातात हात घालून अनधिकृत पार्किंगविरोधात धडक कारवाई करणार आहेत.

bmc
महापालिका

मुंबईतील अनधिकृत पार्किंगविरोधात महापालिकेने हाती घेतलेली कारवाई आता पुन्हा एकदा हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईत जप्त करण्यात येणार्‍या वाहनांवरील कारवाईसाठी आता वाहतूक पोलिसांचेही सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे जप्त करण्यात येणार्‍या वाहनांचे सोपस्कार पूर्ण करून भंगारातील वाहने नवी मुंबईतील तळोजा येथे नेवून टाकण्याचा विचार केला जात आहे. यासाठी एमएमआरडीएचे सहकार्य लाभल्यास पोलीस आणि महापालिकेच्यावतीने जप्त केलेली बेवारस वाहने तळोजाला नेवून टाकण्यात येणार आहेत.

बेवारस वाहनांची विल्हेवाट लावणार तळोजाला

मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे परमबीर सिंह यांनी हाती घेतल्यानंतर बुधवारी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली. यावेळी पोलीस आणि महापालिकेने हातात हात घालून मुंबईत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. सहपोलीस आयुक्त (वाहतूक) आणि महापालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त तसेच सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकाम, अनधिकृत डेब्रीज तसेच अनधिकृत फेरीवाल्यासह अनधिकृत कार पार्किंगवरील कारवाईसंदर्भात चर्चा झाली. यावेळी पोलीस आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवरील कारवाईसह रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगविरोधातील कारवाईसाठी पोलिसांचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली.

कारवाईत पोलिसांचे लाभणार सहकार्य

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी अनधिकृत कारपार्किंगविरोधातील कारवाई हाती घेत वाहनतळापासून ५०० मीटर अंतरावर उभ्या केल्या जाणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु, ही कारवाई मागील काही दिवसांपासून थंडावली आहे. महापालिकेच्यावतीने जप्त करण्यात आलेली बेवारस वाहने ही सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर अशाप्रकारच्या बेवारस वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे अशाप्रकारची बेवारस वाहने जप्त करून ठेवायची कुठे?, असा प्रश्न महापालिकेसह वाहतूक पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे हा तोडगा म्हणून एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यांच्याशी चर्चा करून तळोजा येथील मोठ्या भूखंडावर या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याचा विचार प्रशासन करत आहे. एमएमआरडीच्या मान्यतेनंतर मुंबईतील सर्व बेवारस वाहनांची विल्हेवाट तळोजा येथील भूखंडावर लावली जाणार आहे.

बससह मोठ्या वाहनांवर होणार कारवाई

महापालिकेची कारवाई ही आता निश्चित केलेल्या वाहनतळांपासून ५०० मीटर अंतरावर केली जात असली तरी यापुढे बस स्थानकापासूनच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वाहनांवरही केली जाणार आहे. ही कारवाई आता तीव्र करून बससह मोठ्या वाहनांवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी प्रशासनातील अधिकार्‍यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस चौक्या अधिकृत करा

पोलीस आयुक्तांनी यावेळी मुंबईतील काही अनधिकृत पोलीस चौक्यांबाबतची समस्या मांडत या चौक्या नियमित करण्याबाबत विनंती केली. याबाबत पोलीस आयुक्तांनी, सर्व विभाग कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त आणि विकास नियोजन विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचेही समजते.


हेही वाचा – वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक अभियंताला मारहाण