घरमुंबईमृतांना जिवंत करणाऱ्या डॉक्टरला सोडा; नागरिक आक्रमक

मृतांना जिवंत करणाऱ्या डॉक्टरला सोडा; नागरिक आक्रमक

Subscribe

मृत पावलेल्या व्यक्तीवर उपचाराचे ढोंग करणाऱ्या एका हॉस्पीटलचा अक्षय कुमारने गब्बर इज बॅक या चित्रपटात पर्दा फाश केल्याचे आपण पाहिले आहे. आता असाच एक प्रकार गोंदियामधील गोरेगाव तालुक्यात उघड झाला आहे. गोरेगाव येथील घोटी परिसरातील आयुर्वेदीक डॉक्टरांचा हा प्रताप समोर आला आहे. येथील एका चिमुरड्या मुलाचा सर्प दंशाने मृत्यू झाला होता. त्यावेळी या स्वयंघोषित डॉक्टरांनी असा दावा केला की, आम्ही या मुलाला जिवंत करू. परंतु हे डॉक्टर त्या मुलावर उपचार करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिंसानी ताब्यात घेतले. यावर घोटी येथील स्थानिक नागरिक संतापले. त्यांनी पोलिसांकडे त्या डॉक्टरांना सोडून देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी ही मागणी मान्य न केल्याने नागरिकांनी आज गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चादेखील काढला. यामुळे गोरेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी पोलिसांविरोधातच सुरू केले आंदोलन

रविवारी घोटी येथील गौतम या आठ वर्षाच्या मुलाचा सर्प दंशाने मृत्यू झाला. सर्प दंश झाल्याचे कळताच गौतमला येथील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परंतु याचवेळी बालाघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरुन ते आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत गोरेगाव येथे सोमवारी रात्री उशीरा पोहोचले. मात्र एकदा मृत्यू झालेली व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रध्दा निर्माण करणारा प्रकार असल्याचे सांगत गोरेगाव पोलिसांनी लिल्हारे व त्यांच्या दोन साथीदारांना सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ताब्यात घेतले. पोलिसांनी या डॉक्टरांना ताब्यात घेतल्यामुळे लिल्हारे व त्याचे साथीदार येथे पोहोचू शकले नाहीत, परिणामी त्यांना त्या मृत मुलावर उपचार करता आले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी मृत मुलाच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार ठरवत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया -कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलनदेखील केले. दरम्यान आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता जाणवल्याने गोरेगाव पोलिसांनी पोलिसांची अधिक कुमक मागवली आहे. परंतु अद्याप घोटी परिसरासह गोरेगावमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -