ठाण्यातील खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

खड्डे बुजवण्यासाठी चक्क ठाणे पोलिसांनी घेतला पुढाकार आहे.

Police is giving initiative for vanishing potholes
ठाण्यातील खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांचा पुढाकार

कोरोनाच्या कामात सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देण्यास संबंधित यंत्रणेला वेळ नाही. परिणामी, या खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा अपघात टाळण्यासाठी अखेर ठाणे पोलिसांनीच हातात फावडे, घमेले घेऊन खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पोलिसांनीच हातात घेतले फावडे, घमेले 

ठाण्यातील विवियाना मॉल समोर असलेल्या महामार्गावर पावसामुळे मोठं-मोठे खड्डे पडले आहे. या खड्डयांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलीस ठाण्याकडून संबंधित यंत्रणेला खड्डे बुजवण्यासाठी कळवण्यात आलेले असून देखील हे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अखेर हे खड्डे बुजवण्यासाठी ठाणे पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी स्वत: पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हातात घमेले, फावडे घेऊन महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.

विवियाना मॉल समोरील महामार्गावरून मुंबईच्या दिशेहुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा खड्ड्यामुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी माझ्या पोलीस ठाण्यातील माझे सहकारी पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक विभागाचे कर्माचारी यांची मदत घेऊन तात्पुरता स्वरूपात शक्य होईल तेवढे खड्डे बुजवले आहेत. मागील काही दिवसात विवियाना मॉल समोरील महामार्गावर या खड्ड्यामुळे दोन अपघात झाले असून त्यापैकी एका अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला. संबधीत महामार्ग एमएमआरडीच्या ताब्यात असून खड्डयांबाबतची सूचना या यंत्रणेला देण्यात आली आहे.  – शिरतोडे; राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक


हेही वाचा – नॅशनल पार्कमधील ‘आनंद’ हरपला; वाघाचा कर्करोगाने मृत्यू