लॉकडाऊनपासून आतापर्यंत नियम तोडल्यामुळे ४१ हजार लोकांना अटक; ३४ कोटी ९४ लाख दंड वसूल

Maharashtra police during lockdown
प्रातिनिधिक छायाचित्र

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८८ हजार गुन्हे, तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातून ३४ कोटी ९४ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात दि. २२ मार्च ते २६ ऑक्टोबरपर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे नोंद झाले असून ४१,८२९ व्यक्तींना अटक करण्यात आली. ९६,७०५ वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी ३४ कोटी ९४ लाख ३८ हजार ४५८ रु. दंड आकारण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७९ घटना घडल्या. त्यात ९०३ व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबरवर १ लाख १४ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १ लाख १४ हजार ३१६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,७०५ वाहने जप्त करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील २६,२५४ पोलीस आणि अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी २४,३८३ पोलीस कोरोना मुक्त झाले आहेत.

दुर्देवाने २५५ पोलीस आणि २७ अधिकारी अशा एकूण २८२ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

नागरिकांचा सहभाग

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.