Homeक्राइमTorres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; अडीच ते...

Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त

Subscribe

अनेक गुंतवणूकदारांना फेस आणणाऱ्या टोरेस घोटाळ्याप्रकरणी कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

अरूण सावरटकर

मुंबई : अनेक गुंतवणूकदारांना फेस आणणाऱ्या टोरेस घोटाळ्याप्रकरणी कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी गुरुवारी सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. यावेळी टोरेस कंपनीच्या चार शाखांसह दोन महिला आरोपींच्या घरात छापा टाकून पोलिसांनी अडीच ते तीन कोटीची रोख रक्कम जप्त केली. याकामी दोन ते तीन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकाला गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले तर दोन पथके तपासकामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.

या गुन्ह्यांत दोन मुख्य आरोपींसह इतर काही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच तीन दिवसांपूर्वी शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले.

या तिघांकडून मिळालेल्या माहितीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलाबा, ऑपेरा हाऊस, डोंबिवली, एन.एम. जोशी मार्ग, गिरगाव आणि दादर येथील चार कार्यालयासह तानिया आणि व्हेलेंटिना यांच्या घरावर सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. या कारवाईत पोलिसांनी काही कॅश जप्त केली असून अंदाजे अडीच ते तीन कोटींची ही कॅश असल्याचे बोलले जाते. या आर्थिक घोटाळ्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत.

या गुन्ह्यांच्या तपासासाठी काही पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील एका पथकाकडे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराची माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तीन दिवसांपासून पोलिसांकडून गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी अनेक गुंतवणूकदारांची माहिती घेण्याचे काम सुरू होते.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar