घरमुंबईमुंबईत पुन्हा २६/११सारखा आत्मघाती हल्ला करणार!

मुंबईत पुन्हा २६/११सारखा आत्मघाती हल्ला करणार!

Subscribe

पाकिस्तानातील अज्ञाताकडून वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात फोन

शहरात पुन्हा २६/११सारखा आत्मघाती हल्ला करण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. या धमकीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेच्या ३ पथकांसह एटीएसकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असून प्राथमिक तपासात हा धमकीचा कॉल पाकिस्तानातून आल्याचे उघडकीस आले आहे. धमकीनंतर वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे वरळी परिसरात मुख्यालय आहे. या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर शुक्रवारी रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून मुंबई शहरात पुन्हा २६/११सारखा आत्मघाती हल्ला होणार असल्याचा मेसेज पाठविला होता. या धमकीनंतर ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती. या मेसेजमध्ये या व्यक्तीने लवकरच आम्ही हल्ल्यासाठी सज्ज असून तुम्ही आम्हाला पकडू शकत नाहीत. कारण मी पाकिस्तानातून बोलत आहे. आमच्यासोबत भारतातील काही सहकारी आहेत. मुंबई उडविण्याची तयारी पूर्ण झाली असून आता काही वेळ शिल्लक राहिला आहे. आपण कुठल्याही क्षणी हल्ला करू. ही धमकी नसून आपण प्रत्यक्षात हल्ल्यासाठी येत आहोत. माझे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मी भारताबाहेर सध्या पाकिस्तानात आहे.

- Advertisement -

भारतात आमचे ६ लोक आहेत. तेच हे काम करणार आहेत. आमचा काही ठिकाणा नसल्याचे सांगून त्याने अल जवाहर, अजमल कसाबच्या नावाचा उल्लेख केला होता. यावेळी त्याने काही क्रमांक पाठविले होते. ते सर्व क्रमांक भारतीय आहेत. ज्या मोबाईलवरून ही धमकी देण्यात आली, तो क्रमांक पाकिस्तानच्या मोहम्मद इम्तियाज नावाच्या एका व्यक्तीचा आहे. मोहम्मद इम्तियाज हा लाहोरचा रहिवासी असून त्याचा या धमकीशी काहीही संबंध नाही. त्याचा मोबाईल काही दिवसांपूर्वी हरवला होता. याच मोबाईलवरून दुसर्‍या व्यक्तीने धमकी दिल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे या धमकीनंतर मुंबई पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

मुंबईकरांना घाबरण्याचे कारण नाही
दरम्यान, या धमकीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात एक पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. गुन्हे शाखेच्या ३ युनिटला कामाला लावण्यात आले आहे. त्यांच्यासाठी एटीएस, राष्ट्रीय तपास यंत्रणा, गुप्तचर विभाग तसेच रॉ या तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे. या तपास यंत्रणांना आलेल्या धमकीसह इतर माहिती देण्यात आली आहे. मुंबईकरांना घाबरण्याचे काहीही कारण नसून मुंबई पोलीस अशा धमक्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहून संशयित व्यक्ती आणि वस्तूची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

सुरक्षा व्यवस्थेत वाढ
दुसरीकडे आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आदी सण असल्याने मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांना कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेऊन नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर देण्यास सांगण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महत्त्वाच्या शासकीय, निमशासकीय निवासस्थान, मंत्रालय, विधान भवनासह महत्त्वाची रेल्वे स्थानके, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -