मुंबई : कोल्हापूर शहरातील स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून शहरात शांतता आहे. अनेक भागातील दुकाने सुरू झाली आहेत. शहरात बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी 36 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर 400 जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. प्रत्येक दंगलीमागे राजकीय हात असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. ते आज माध्यमांशी बोलत होते. (Political hand behind every riot; Who did Sanjay Raut make a serious accusation against?)
संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक दंगलीमागे गेल्या साधारण दहा वर्षांमध्ये राजकारण आहे आणि राजकीय हात आहे. या राजकारण्यांना चटक लागली आहे. विशेषत: त्यांना धर्मांधतेचं राजकारण करायचं आहे. अशाने चटक लागली आहे. राजकारणाचा सोपा मार्ग ते निवडतात. दंगली आणि तणाव निर्माण करतात. हिंदु-मुसलमान किंवा अन्य धर्मांमध्ये भेदाभेद करून मग निवडणुकीला सामोरे जातात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये आजही भारतीय जनता पक्ष महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायची हिंमत दाखवत नाही. याला किती वर्ष झाली, ते आपणच मोजा. मुंबईसारखं शहर हे महापौरांशिवाय आहे. पुणे, नागपूर, ठाणे असेल याठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून एकतर्फी राज्यकारभार सुरू आहे. कारण त्यांना खात्री आणि आत्मविश्वास नाही, लोक काय निकाल देतील! त्यामुळे हळूहळू अशाप्रकारे धार्मिक उन्माद निर्माण करून निवडणुकांना सामोरे जायचे आणि त्याची तयारी स्पष्टपणे दिसते आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राला मागे रेटणारं, बेआब्रू करणारं राजकारण
तुमचं हिंदुत्व एवढं कच्च आहे का? एवढं तकलादू पायावरती तुमचं हिंदुत्व आहे का? कुठल्यातरी मोघल राजाच्या फोटोमुळे हिंदुत्व धोक्यात आले. हा काय प्रकार आहे. कारवाया करा, अटक करा, कठोर कलम लावा. अशा घटना घडल्या, घडवल्या की घडवून आणल्यावर ताबडतोब संपूर्ण राज्यभरातून एका विशिष्ट संघटनेला निरोप द्यायचा आणि त्या संघटनेच्या माणसांनी तिकडे जमायचं. जी अर्धी शिक्षित मुलं असतात त्यांची माथी भडकवायची आणि मग अशाप्रकारे उन्माद निर्माण करू राज्य अस्थिर करायचं आणि त्या आधारावरती धोका-धोका म्हणून निवडणुकांना सामोरे जायचं अशाप्रकारचं महाराष्ट्राला मागे रेटणारं, महाराष्ट्राची बेआब्रु करणारं घाणेरडं राजकारण या राज्यात सुरू आहे, अस परखड मत संजय राऊत यांनी मांडले.
महाराष्ट्रातला सगळी गुंतवणूक गुजरात राज्यात न्यायची
राज्यात घडणाऱ्या घटनांचा फायदा घेऊन महाराष्ट्रातले सगळे उद्योग आणि गुंतवणूक बाजूच्या राज्यात न्यायचे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्र अस्थिर आहे, महाराष्ट्रामध्ये कायदा-सुव्यवस्था नाही, हे चित्र निर्माण करायला लावायचे, करायचे आणि मग महाराष्ट्रातली सगळी गुंतवणूक गुजरात राज्यात न्यायची. हे अशाप्रकारचं कारस्थान सध्या इथे सुरू आहे आणि आमचे लोक याला बळी पडत आहेत, असे ते म्हणाले.