विरार-नालासोपारामध्ये ‘चोर की पोलीस’ बॅनरवरून वाद!

virar
प्रदीप शर्मा

नालासोपारा आणि विरार शहरातील काही भागात काल, शनिवारी रात्री भगवा रंगावर ‘चोर की पोलीस’ असा मजकूर असलेले मोठमोठे बॅनर झळकले. त्यावरून काही वेळ वाद निर्माण झाला. शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी फाईटमधील पहिली सलामी अशी धडाक्यात झडली आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या साम्राज्यात प्रथमच असे थेट पोस्टर वॉर सुरू झाले आहे. हे बॅनर लावणाऱ्या कंत्राटदाराने हे बॅनर उतरावेत म्हणून एका नगरसेवकाने त्याला गळ घातली होती. मात्र शर्मा यांचे हे बॅनर असल्याचे कळल्यावर मला काही प्रॉब्लेम नाही, असे सांगत त्याने काढता पाय घेतला. दरम्यान, रविवारी काही भागात महापालिकेकडून बॅनर काढण्यात आले. तेव्हा वातावरणात तणाव निर्माण झाला होता. रितसर पैसे भरून लावलेले बॅनर बेकायदेशीरपणे काढले जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी महापालिकेचे कर्मचारी बॅनर हटवत होते. पण, शिवसेनेने आक्षेप घेतल्यानंतर बॅनर काढण्याचे काम थांबवले गेले.

प्रदीप शर्मा यांची नालासोपार्‍यात एंट्री

राजकारणात उतरलेल्या प्रदीप शर्मा यांची आज, रविवारी दुपारी विरारमार्गे नालासोपार्‍यात एंट्री झाली. शे-दोनशे गाड्या, मोटारसायकलीच्या ताफ्यात शर्मा यांचे आगमन झाले. यावेळी भगव्या टोप्या आणि झेंडे घेऊन शिवसैनिक ताफ्यात मोठ्या संख्येने सामिल झाले होते. या एंट्रीने शर्मा नालासोपार्‍यातून निवडणुक लढवणार हे निश्चित झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासूनची प्रदीप शर्मा यांची नालासोपार्‍यात येत असल्याची प्रतिक्षा रविवारी दुपारी संपली. पांढरा शर्ट, कपाळावर टिळा आणि गळ्यात भगवा घातलेले शर्मा दुपारी दोनच्या सुमारास विरार फाट्यावर अवतरले. यावेळी शे-दोनशे गाड्या, मोटारसायकली त्यांच्या ताफ्यात होत्या. गाड्यांवर भगवे झेंडे आणि डोक्यावर भगव्या टोप्या घातलेले कार्यकर्ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. काही काळ पत्रकारांशी संवाद साधून शर्मा यांचा ताफा विरारकडे रवाना झाला. कोठून लढणार याविषयी प्रश्न विचारले असता, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.

एन्काऊंटर स्पेशालिस्टची राजकारणात एन्ट्री

दाऊद, छोटा राजन सारख्या नामचीन गुंडांशी लढलो. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना ठार मारले. तर वसईतील गुंडगिरी मोडायला वेळ लागणार नाही, असे सूचक विधान करीत शर्मा यांनी नालासोपार्‍यातूनच लढणार यावर शिक्कामोर्तब केले. कुणीही दबंग नसतो. सरकारच दबंग असते. नालासोपार्‍यातून शिवसेनेने पहिल्यांदाच वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे. त्यामुळे गेली ३० वर्षे कुशासन करत असलेल्या सत्ताधार्‍यांचा अस्त होईल, असेही शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. विरारहून नालासोपारापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, आगरी सेनेचे जिल्हाप्रमुख जनार्दन पाटील यांच्यासह सेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा –

‘आता द्राक्ष आंबट वाटू लागली’; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांवर टीकास्त्र