नालेसफाई अभावी मुंबईची तुंबई झाल्यास शिवसेना, पालिका जबाबदार – प्रभाकर शिंदे

Prabhakar Shinde

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई अभावी मुंबईची तुंबई झाल्यास त्यास सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासन हेच जबाबदार असतील, असे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा व पहारेकरी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबईत एप्रिल महिन्याच्या मध्यानंतर नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात येते. मुंबईत मिठी नदी, दहिसर, पोयसर नद्यांची व लहान – मोठ्या नाल्यांची सफाई कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करून संपविणे आवश्यक असते. नाल्यातील फक्त गाळ काढायचे काम नसते तर तो गाळ उचलून नजीकच्या डंपिंग ग्राउंडवर अथवा जागेचा अभाव असल्यास मुंबईबाहेरील जागेत टाकणे व त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते.

पालिका दरवर्षी या नालेसफाई व नद्यांच्या सफाई कामांवर किमान १५० कोटी रुपये खर्च करते. नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसानंतर अशा तीन टप्प्यात करणे आवश्यक असते. पालिका खासगी कंत्राटदारांमार्फत ही नालेसफाईची कामे करून घेते. तर रस्त्यालगत असलेल्या पर्जन्यजलवाहिन्यांची सफाईकामे पालिका वार्ड कार्यलयामार्फत स्वतःची यंत्रणा वापरून करते.

मात्र जर नालेसफाईची कामे वेळेत न झाल्यास व त्याच वेळी मुसळधार पाऊस पडल्यास आणि समुद्राला मोठी भरती असल्यास मुंबईतील सखल भागात पावसाचे पाणी साचते नद्या व नाले ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच जनजीवन विस्कळीत होऊन मुंबईची तुंबई होते. परिणामी मुंबईकरांचे हाल होतात.

नालेसफाई वेळेतच सुरू होणार – पालिका

नालेसफाईची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. पालिका या कामांवर १५० कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यापैकी ८० कोटी रुपये मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी खर्च करण्यात येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी सांगितले.