Corona Vaccination: कोरोना लस घेऊन आजीबाईंनी साजरं केलं शतक!

Prabhavati Khedkar brought up her century by getting vaccine at bkc covid care centra
Corona Vaccination: कोरोना लस घेऊन आजीबाईंनी साजरं केलं शतक!

देशभरात सर्वत्र कोरोना लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण्याच्या मोहीमेला देशभरात सुरुवात झाली. आता देशातील कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून २ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र मुंबईत सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. आज या तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील १०० वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाची लस घेतली. विशेष म्हणजे या आजीबाईंचा आज १००वा वाढदिवस होता. या निमित्ताने कोरोना लस घेतल्यानंतर आजीबाईंचा १००वा वाढदिवस कोविड केअर सेंटरमध्ये साजरा करण्यात आला. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेनं ट्विटद्वारे दिली आहे.

प्रभावती खेडकर असं या आजीबाईंचं नाव आहे. आज आजीबाईंनी १००वा वाढदिवस बीकेसीतील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना लस घेऊन साजरा केला. याबाबत मुंबई महापालिकेनं आजीबाईंचा केक कापतानाचा फोटो ट्विट करून लिहिलं आहे की, ‘एक आरोग्यमय साजरीकरण! प्रभावती खेडकर नामक आजींनी त्यांचा १००वा वाढदिवस बीकेसी कोविड हॉस्पिटल येथे कोरोनाची लस घेऊन साजरा केला. त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं याचं आम्हाला समाधान आहे. यापुढेही त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी कामना आम्ही करतो.’

दरम्यान सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत मुंबईत १ हजार १८८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३२ हजार २०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ४९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील २४ तासांमध्ये १ हजार २५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ९ हजार ४३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – फक्त एका किंचाळीने होणार ३ मिनीटात कोरोनाचे निदान; डच शास्त्रज्ञाचा दावा