मुंबई : “आपण महायुतीमध्ये आल्यानंतर आपल्याला आपली ताकद दाखविल्याशिवाय कोणी न्याय देईल”, असे वक्तव्य अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागेवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मुंबईतील विधानसभेच्या 36 जागा आहेत. महाराष्ट्राच्या 15 टक्के जागा केवळ मुंबईत आहेत. हे आपण विसरून चालणार नाही. मुंबई, ठाणे आणि पालघर मिळून विधानसभेच्या एकूण 60 जागा असून हा मोठा भाग आपण राष्ट्रवादी काँग्रेसने बळकट केला नाही. तर आपण महाराष्ट्रात मजबूत केले आहे, हे सांगता येणार नाही.” पुढे प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आपण महायुतीमध्ये आल्यानंतर आपल्याला आपली ताकद दाखविल्याशिवाय कोणी न्याय देईल, अशी अपेक्षा कसे करू शकतो. यामुळेच आपण सर्वांना आपली ताकद उभी करावी लागेल. त्याशिवाय आपल्याला हक्काने कुठलीही जागा मागता येणार नाही.”
हेही वाचा – समीर भुजबळ मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
समीर भुजबळांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती
अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बुधवारी मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा – ताईंचं पंचांग ‘हेरंब’ लिहितात, सुप्रिया सुळेंना आशिष शेलारांचे कवितेतूनच उत्तर
राष्ट्रवादीच्या स्थापनेत भुजबळांचे मोठे योगदान- पटेल
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेच्या कार्यात मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचं योगदान अतिशय महत्वाच आहे. मुंबई शहराला समीर भुजबळ यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाची गरज होती. मुंबईत पक्षाचे जाळ वाढण्यासाठी समीर भुजबळ हे यशस्वीपणे काम करतील. मुंबई शहराकडे आजवर पक्षाकडून दुर्लक्ष झालं आगामी काळात मुंबईचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाशिक प्रमाणे मुंबई शहराचा समीर भुजबळ यांचा गाढा अभ्यास असून त्यांच्या काम करण्याची क्षमता असल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. नाशिक प्रमाणे मुंबईला देखील काम करावं असे त्यांनी सांगितले.