मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांचा वरळीस्थित फ्लॅट ईडीकडून जप्त

Praful Patel NCP
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा वरळीस्थित सीजे हाऊसमधील फ्लॅट सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारात कुख्यात गुंड दाऊदचा हस्तक इकबाल मिर्ची याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा

डीएचएफएलच्या वाधवान बंधूंची चौकशी सुरू असताना ते वरळी येथे बिल्डिंग बांधत असल्याचे समोर आले होते. तेव्हा इक्बाल मिर्ची याचे नाव समोर आले होते. सुमारे २०० कोटींचा सौदा ठरला होता. पण इक्बाल मिर्चीच्या मुलाने आणखी रकमेची मागणी केल्याने तो सौदा अडकला. त्याअनुषंगाने ईडीने इक्बाल मिर्चीच्या इतर व्यवहारांची चौकशी सुरू केली. तेव्हा सीजे हाऊसचे प्रकरण समोर आले.

सीजे हाऊस जिथे उभी आहे, त्या जागेचा काही भाग इक्बाल मिर्ची याच्या नावे होता. तिथे पूर्वी इक्बाल मिर्चीचाफिशरमॅन वार्फ हा पब होता. वरळीचे प्रसिद्ध गुरुकृपा हॉटेलही याच जागेत होते. त्याने ही जागा एका ट्रस्टच्या माध्यमातून मिलेनियम डेव्हलपर्सला विकली होती. मिलेनियम डेव्हलपर्स हे प्रफुल्ल पटेल यांची कंपनी आहे. १९८६मध्ये इक्बाल मिर्ची याने ही मालमत्ता दोन लाख रुपयांना विकत घेऊन पहिली पत्नी हाजरा हिच्या नावावर केली होती.

यादरम्यान याठिकाणी इमारत उभी राहिली होती. या इमारतीमध्ये इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट आणि ९ हजार चौरस फुटाचे दोन अलिशान फ्लॅट मिळाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने इक्बाल मिर्चीच्या या दोन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या.

सीजे हाऊस इमारतीच्या सर्वात वरचे चार मजले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे आहेत. त्यातील दोन मजले त्यांनी भाड्याने दिले आहेत. याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची २०१९ ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने आता चारही मजले जप्त केल्याचे सांगण्यात येते. इक्बाल मिर्चीचे दशकभरापूर्वी लंडनमध्ये निधन झाले. १९९३नंतर विविध गुन्हे दाखल झाल्याने तो देशाबाहेर पसार झाला होता.