व्हिडीओ प्रकरणात प्रकाश सुर्वेंच्या मुलाने पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

सध्या शिवसेनेच्या (शिंदे गट) शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी तक्रार दाखल केलेली असतानाच आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने देखील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Prakash Surve's son filed a complaint in the police station in the video case

मागाठाणे येथे शनिवारी आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहिले होते. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागाठाणे विभागात एका जीपमधून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमधला शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या संदर्भातील एका आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल केली. पण आता याचप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शीतल म्हात्रे यांनी रविवारी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक केली आहे. तर आज राज सुर्वे यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत राजकीय वैमनस्यातून माझ्या वडिलांची बदनामी केली आहे. त्यामुळे संबंधित आरोपींविरोधात लवकरात लवकर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला हा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर चुकीच्या अर्थाचे गाणे लावून आणि चुकीचा संदेश लिहून हा व्हिडीओ मातोश्रीच्या फेसबुक पेजवरून व्हायरल करण्यात आला असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार देखील त्यांच्याकडून नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा – शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी सभागृहात महिला आमदार आक्रमक, अध्यक्षांनी दिले निर्देश

तर शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा कथित मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे. परंतु, या व्हिडीओ मॉर्फ करण्यामागे कोण मास्टरमाईंड आहे, याचा शोध घेतला जावा, या मुद्द्यावरून विधासनभेत आज खडाजंगी झाली. आमदार यामिनी जाधव यांनी याप्रश्नी सभागृहात पाँइट ऑफ इन्फोर्मेशन मांडली. यावेळी सभागृहातील इतर महिला आमदारांनीही याविरोधात आवाज उठवल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला निर्देश दिले आहेत.