मालाडमधील अनधिकृत बांधकामे BMC च्या आशिर्वादाने, प्रवीण दरेकरांचा आरोप

इमारत दुर्घटनाग्रस्त होण्यास कारणीभूत असलेल्या प्रत्येकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा

Praveen Darekar alleges Unauthorized constructions in Malad with the help of BMC
मालाडमधील अनधिकृत बांधकामे BMC च्या आशिर्वादाने, प्रवीण दरेकरांचा आरोप

मालाडमध्ये इमारत कोसळून जिवितहानी झाली आहे. पहाटेच्या सुमारास २ ते ३ मजली इमारत कोसळल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून काही लोकं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत तरुण आणि अल्पवयीन मुलांचाही मृत्यू झाला आहे. पहिल्याच पावसात दुर्घटना घडल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.मालाड भागात अनधिकृत बांधकाम होत असतना महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडली आहे. मालाडमध्ये २ ते ३ माळ्याच्या इमारती बीएमसी, पोलीस आणि डेप्युटी कलेक्टरच्या आशिर्वादाने होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मालाडमध्ये चिंता करणारी घटना घडली आहे. या घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून खासदार गोपाळ शेट्टींनी यापुर्वीच अलर्ट केले होते. २ ते ३ माळ्याच्या इमारती कधीही कोसळू शकतात आणि लोकांच्या जिविताला धोका आहे. सरकारला पत्र लिहिले असूनही सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. यामुळे १६ लोकांना मृत्यूला सामोरे जावं लागले आहे. अनधिकृत बांधकामं डेप्युटी कलेक्टर, बीएमसीच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाहीत. ज्यावेळी हे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी परवानगी दिली आहे का? दिली असेल तर त्यावेळी डेप्युटी कलेक्टर आणि पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अशी मगणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

या दुर्घटनेला कोण जबाबदार?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दुर्घटनाग्रस्त ठिकाणाची पाहणी केली. यावेळी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर त्या ठिकाणी उपस्थित होत्या. मालाडमध्ये चार-चार माळ्याच्या अनधिकृत झोपड्या उभ्या राहत आहेत, यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, अशा आशयाच पत्र देऊन देखील,त्याकडे दुर्लक्ष केल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास यावेळी आणून दिली. ‘या दुर्घटनेला कोण जबाबदार?’ यावर तर्कवितर्क लावत बसण्यापेक्षा संबंधितांवर कारवाई व्हावी,अशी आमची मागणी आहे. याविषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. इमारत दुर्घटनाग्रस्त होण्यास कारणीभूत असलेल्या प्रत्येकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही दरेकरांनी केली आहे.