Monsoon Update : मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत पावसाची दमदार हजेरी, लोकल सेवेवर परिणाम

pre monsoon rain entry in mumbai and suburbs with strong winds

मुंबईकरांची आजची संध्याकाळ अखेर सुखावणारी झाली आहे. मुंबईसह ठाण्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: दक्षिण मध्य आणि उत्तर भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील बोरिवली,  कांदिवली, दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, माहीम, माटुंगा, वरळीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर ठाणे, नवी मुंबई भागातही पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. सोशल मीडियावरही मुंबईकरांनी पावसाचा आनंद व्यक्त केले आहे. अनेकांनी पावसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढत होता. मात्र आज पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांना गारवा अनुभवण्यास मिळतोय. मुंबईतील अचानक पावसाच्या हजेरीमुळे कामावरून निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान दुसरीकडे दिवा रेल्वे स्थानक परिसरातील पावसाने अचानक हजेरी लावल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. कोकणातही येत्या 48 तासात पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मान्सून 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सर्व भागात आणिदोन दिवसांत मुंबईमध्ये मान्सून चांगला सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

रेल्वे वाहतूकवरील परिणाम 

मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबई लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच बाकीच्या काही स्टेशनवर पावसाने हजेरी लावल्याने रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. दरम्यान वरळी, दहिसर, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई येथे पावसाने हजेरी लावल्याने रेल्वेबरोबर वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वेचे वेळापत्रक काही मिनिटे उशारी धावत असून सीएसएमटी स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.