गोवंडी येथील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यास हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

समाजवादीच्या नगरसेविकेकडून उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याची मागणी; पालिकेचा सकारात्मक निर्णय

Pro-Hindu organizations oppose naming the park as Tipu Sultan
हिंदू जनजागृती समिती व अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन सदर उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्यास लिखित निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला

मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र.१३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्याबाबत समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने सकारत्मकता दर्शवत हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र हिंदू जनजागृती समिती व अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन सदर उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्यास लिखित निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला आहे.

सदर उद्यानाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव द्यावे,अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी पालिकेला दिला आहे. यासंदर्भातील विषय गुरुवारी १५ जुलै रोजी होऊ घातलेल्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीसाठी सादर करण्यात आलेला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी, “टिपू सुलतान याचे मुंबईसाठी योगदान काय? त्याचे नाव इथे कशासाठी? याविषयी प्रशासकीय नियमांची पडताळणी करून मी लक्ष घालते,” असे आश्वासन हिंदुत्ववादी संघटनांना दिले आहे. त्यामुळे सदर प्रस्तावावर बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची अथवा अभूतपूर्व गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे आता या विषयाला व त्यावरील प्रशासकीय अभिप्रायाला विरोध करणे शिवसेनेला भाग पडणार आहे. जर विरोध केला नाही तर शिवसेनेची सत्ता असताना असा प्रस्ताव मंजूर झालाच कसा, असे प्रश्न उपस्थित होऊन हिंदुत्ववादी संघटनांकडून जाब विचारला जाण्याची व यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रुक्साना सिद्दीकी यांनी, २५ जानेवारी २०२१ रोजी ठराव मांडून गोवंडी येथील प्रभाग क्र.१३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुल्तान याचे नाव देण्याबाबत बाजार व उद्यान समिती अध्यक्ष यांच्याकडे मागणी केली होती. टिपू सुल्तान हा भारतीय क्रांतीसेनानी होता. दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रांताचा तो राजा होता. तसेच, तो योग्य शासक व महान योद्धा आणि सर्वगुणसंपन्न राजा होता. त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात युद्ध पुकारले होते.भारताला इंग्रजांपासून मुक्त करण्याचा त्यां पहिला प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्या या महान कार्याबद्दलची माहिती चिरंतन राहावी म्हणून गोवंडी येथील उद्यानाचे ” टिपू सुल्तान उद्यान” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी मागणी केली होती. त्यावर पालिका आयुक्तांनी १० जून रोजी सकारात्मक अभिप्राय दिले आहेत. सदर उद्यानाचा भूभाग हा उद्यानासाठीच आरक्षित होता. त्यामुळे या उद्यानाचे ” टिपू सुल्तान” असे नामकरण करण्यास बाजार व उद्यान समितीने मान्यता द्यावी, अशी शिफारस आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात केली आहे.

त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त करीत महापौर किशोरी पेडणेकर आणि बाजार व उद्यान समिती उप अध्यक्ष तुकाराम पाटील यांची भेट घेऊन सदर उद्यानाचे ” टिपू सुल्तान उद्यान” असे नामकरण करण्यास विरोध दर्शवला आहे. आता शिवसेना गुरुवारी होणाऱ्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत या विषयाला विरोध करणार की सहमती देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध का ?

मुंबईतील विविध स्थळांना विविध धर्मातील महनीय व्यक्तींची नावे आहेत. त्याला आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही; मात्र ज्याने दक्षिण भारतातील हिंदूंची १ हजार मंदिरे पाडली, लाखो हिंदू महिलांवर अत्याचार केले, लाखो हिंदूंच्या हत्या केल्या, तलवारीच्या बळावर लाखो हिंदूंचे धर्मांतर केले, अशा क्रूर टिपू सुलतान याचे नाव उद्यानाला देणे हे हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार असून हे उदात्तीकरण हिंदू समाज कदापी सहन करणार नाही. सदर उद्यानाला अन्य राष्ट्रपुरुषाचे नाव द्यावे,अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी पालिकेला दिला आहे.