घरमुंबईएका महिन्यात मशिदीवरील भोंगे हटवा; अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा- राज ठाकरे

एका महिन्यात मशिदीवरील भोंगे हटवा; अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा- राज ठाकरे

Subscribe

मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्याचा अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मनसेच्या पाडवा मेळाव्यादरम्यान दिला. शिवाजीपार्कात आयोजित पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांचा विषय छेडला आहे. त्यासोबतच माहिमच्या समुद्रात उभ्या राहात असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्याचीही मागणी राज ठाकरेंनी केली.

ते म्हणाले की, ‘मागील वर्षी मशिदीवरील भोंग्यांचे आंदोलन झाले तेव्हा काही काळ भोंगे उतरले, पण आता ते पुन्हा वाजू लागले आहेत. एक तर ते तुम्ही बंद करा किंवा मग आम्ही करतो. मग त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा.’ असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला. गेल्यावर्षी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचाही दाखला दिला होता.

- Advertisement -

ज्या मशिदीवर भोंगे लावले जातील त्यासमोर हनुमान चालिसा वाजवण्याचे आवाहन राज यांनी मागील वर्षी केले होते. त्यानंतर झालेल्या आंदोलनात राज्यभरात १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. हे गुन्हे मागे घेण्याचे आवाहनही राज यांनी एकनाथ शिंदेंना केले आहे.दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्तांना आदेश देत याठिकाणी पाहणी घेत आढावा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याठिकाणी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

माहिम समुद्रात उभारल्या जाणार्‍या अनधिकृत दर्ग्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा
माहिमच्या समुद्रात दुसरे हाजी अली दर्गा अनधिकृतरित्या उभारले जात असल्याचा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘माहिम समुद्रात मकदुम बाबा दर्गा उभारला जात आहे. त्याकडे माहिम पोलिसांचे लक्ष नाही, की महापालिकेचेही लक्ष नाही. हा नवीन हाजी आली दर्गा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना आजच सांगतो की महिनाभरात कारवाई करून तो दर्गा हटवला गेला पाहिजे. अन्यथा त्याच्याच बाजूला मोठं गणपती मंदिर आम्ही उभे केल्याशिवाय राहणार नाही. मग काय व्हायचे ते होऊ देत’ असा इशाराही राज यांनी दिला आहे. राज यांच्या सभेत लावलेल्या मोठ्या स्क्रिन्सवर त्यांनी माहिम समुद्रातील ड्रोन व्हिज्यूअल्स दाखवले. त्यात कशाप्रकारे समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवले. प्रशासनाचे लक्ष नसले की कसे होते, ते बघा, असे म्हणत त्यांनी सुज्ञ मुस्लिमांनाही हे पटते का, असा सवाल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -