घरमुंबईराहुल गांधींना मिळताहेत सर्वाधिक Likes

राहुल गांधींना मिळताहेत सर्वाधिक Likes

Subscribe

सध्या सोशल मीडिया नेटवर्किंगने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. ट्विटरसारख्या मायक्रो सोशल मीडिया नेटवर्किंगचा वापर बड्या सेलिब्रेटींपासून ते राजकीय पुढार्‍यांपर्यंत सर्वचजण करताना आढळतात. एका लहान ट्विटनेही काय हंगामा होतो हे सर्वांनी अनुभवले आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत या सोशल मीडियाचा वापर करत भाजपने सत्तेला गवसणी घातली हे सत्य कोणीही नाकारू शकलेले नाही. मात्र आता चित्र बदलले आहे. भाजप पप्पू म्हणून ज्यांची हेटाळणी करते ते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलाच धोबीपछाड दिला आहे. राहुल गांधींच्या ट्विटला मोदींपेक्षा जास्त लाईक्स मिळत आहेत. तर महाराष्ट्रात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे व्यंगचित्र भाव खाऊन जात आहे. राज ठाकरेंनी ट्विट केलेल्या व्यंगचित्राला राज्यात सर्वाधिक लाईक्स मिळत आहेत.

राहुल गांधींची सोशल मीडियावर सर्वाधिक खिल्ली उडवली जाते. मात्र तेच राहुल गांधी आज ट्विटरवर धुमाकूळ घालू लागले आहेत. त्यांच्या ट्विटला प्रचंड लाईक्स मिळत असल्याची बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटला २० ते २१ हजार लाईक्स मिळत असतील तर राहुल गांधींच्या ट्विटला मिळणारे लाईक्स हे सुमारे २९ हजारांच्या घरात आहेत. त्यातही मोदींच्या अनेक ट्विटना फक्त दोन ते तीन हजार लाईक्स आहेत. मात्र राहुल गांधींच्या सर्वच ट्विटना कमीतकमी १० हजारांच्या लाईक्स मिळत असल्याचे उघडकीस आले आहे.

- Advertisement -

राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून निवडणुकींच्या प्रचारासाठी या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी अधिकृत ट्विटर उघडलेले आहे. ज्यावरुन ते त्यांची मते मांडत असतात. नरेंद्र मोदी आणि विशेष करुन भारतीय जनता पार्टीने २०१४ साली ट्विटर आणि त्यासारख्या नेटवर्किंग साईटचा वापर लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात करुन घेतला. पण सध्या ट्विटरवर काही वेगळेच चित्र पहायला मिळत आहे.

नरेंद्र मोदींपेक्षा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जास्त लोकप्रियता मिळत आहे. ‘आपलं महानगर’कडून या दोघांच्या हॅडलवरील गेल्या दोन दिवसांपासून केलेले ट्विट तपासण्यात आले. त्यानुसार मोदींनी अमित शहा यांना वाढदिवसाबद्दल दिलेल्या शुभेच्छा ट्विटला सुमारे २० हजार लाईक्स मिळाल्या आहेत. तर चार हजार जणांनी त्यांचे ते ट्विट, रिट्विट केले आहे. त्या अगोदर त्यांनी आझाद हिंद फौज सेनेच्या कार्यक्रमानिमित्त केलेल्या ट्विटला २१ हजार ७८२ लाईक्स मिळाल्या होत्या. तर त्यापूर्वीच्या महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या ट्विटला २ हजार ०४७ तर अजून एका ट्विटला २ हजार ६८६ लाईक्स मिळाल्याचे आढळून आले.

- Advertisement -

दुसरीकडे राहुल गांधींबाबत मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. राहुल गांधी यांचे सोमवारपर्यंतचे पाच ट्विट लक्षात घेतले तर पाचपैकी चार ट्विटला दहा हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर एका ट्विटला तब्बल २९ हजार लाईक्स मिळत असल्याचे दिसून आले आहे. अमृतसर रेल्वे दुर्घटनेसंदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटला २९ हजार लाईक्स मिळाल्या आहेत. ते ट्विट जवळपास ७ हजार लोकांनी रिट्विट केले आहे. राहुल गांधी यांनी अंबानी आणि मोदींच्या संदर्भातील एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला असून ज्याला १६ हजार २९८ जणांनी लाईक्स केले आहे. त्यावर २ हजार जणांनी प्रतिउत्तर देखील दिले असून पाच हजार जणांनी ते रिट्विट केले आहे.

राज्यातील नेत्यांना अल्प प्रतिसाद

‘आपलं महानगर’कडून राज्यातील अनेक नेत्यांच्या ट्विटरचाही आढावा घेण्यात आला. ज्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. एकीकडे केंद्रातील नेत्यांना मिळणार्‍या लाईक्स आणि रिप्लायची संख्या लक्षात घेता राज्यातील नेत्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोमवारपर्यंतच्या पाच ट्विटवर नजर टाकली असता त्यांच्या ठराविक पोस्टलाच हजारांच्यावर लाईक्स मिळाल्याचे दिसतेय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना, त्यांनी वाढदिवसाबद्दल केलेल्या ट्विटला १ हजार ३५९ लाईक्स मिळाल्या आहेत. तर त्यांच्या इतर ट्विटला अनुक्रमे ५३२, २९९,५५० आणि ९३४ लाईक्स मिळाल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ट्विटलाही अत्यल्प प्रतिसाद आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारपर्यंत केलेल्या पाच ट्विटवर नजर टाकली असता, त्यांच्या एम.जे.अकबर यांच्याबद्दलच्या ट्विटला सर्वाधिक ३४२ लाईक्स मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामसंदर्भात केलेल्या ट्विटला १८०, विश्वेश्वरांच्या ट्विटला २११ आणि नाशिक दौर्‍याच्या ट्विटला १४७ लाईक्स मिळाल्या.

राहुल गांधी यांनी उद्योगपती अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेद्र मोदींच्या संदर्भातील एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला आहे. त्याला १9 हजार २९८ जणांनी लाईक्स केले आहे. त्यावर २ हजार जणांनी प्रतिउत्तर देखील दिले असून पाच हजार जणांनी ते रिट्विट केले आहे.

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांची चलती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सर्वसामान्य ट्विटला राज्यातील इतर नेत्यांसारखाच प्रतिसाद आहे. मात्र राज ठाकरे हे त्यांचे व्यंगचित्र जेव्हा ट्विट करतात तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. राज ठाकरे यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात काढलेल्या व्यंगचित्राला सुमारे तीन हजार लाईक्स मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ या व्यंगचित्रास ३ हजार ५७२ लाईक्स मिळाल्या आहेत. तर कपड्यापासून सूत या व्यंगचित्रास देखील तीन हजारांच्यावर लाईक्स मिळाल्या आहेत.

राष्ट्रपती करतात माजी राष्ट्रपतींनाच फॉलो

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देखील ट्विटरवर अधिकृत खाते आहे. ४.३ लाख जण त्यांना फॉलो करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना जरी लाखोजण फॉलो करत असले तरी ते फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतात. ती व्यक्ती म्हणजे देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. राष्ट्रपतींनी आतापर्यंत ४ हजार ४१४ ट्विट केले आहेत.

नेते आणि त्यांचे फॉलोअर्स

राष्ट्रपती रामनाथ कोविंद – ४२ लाख ९९ हजार ४०९
पंतप्रधान नरेंद्र मोदी – 4 कोटी ४३ लाख ५७ हजार ४०२
राहुल गांधी – 78 लाख ३३ हजार २५४
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – 31 लाख २३ हजार ११२
पृथ्वीराज चव्हाण – 1 लाख 24 हजार 306

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -