अब्रुनुकसानी प्रकरणी राहुल गांधींवर आरोप निश्चित, भिवंडी कोर्टाने दिला निर्णय

राहुल गांधी (प्रातिनिधीक चित्र)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरील आरोप निश्चित झाले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी आज भिवंडी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यासाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर होते. दरम्यान, आपण निर्दोष असल्याच्या दाव्याचा यावेळी राहुल गांधींनी पुनरुच्चार केला.

‘…ला आरएसएस जबाबदार’

२०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘महात्मा गांधींच्या हत्येला आरएसएस जबाबदार आहे’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी आरएसएसच्या भिवंडी शाखेचे सचिव राजेश महादेव कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. मार्च २०१५ मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ‘राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत’, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.

राहुल गांधी म्हणतायत ‘मी निर्दोष’

न्यायालयाने जरी दोषी ठरवलं असलं, तरी राहुल गांधींनी मात्र आरोप फेटाळले आहेत. ‘या प्रकरणात आपण निर्दोष आहोत’ असा दावा राहुल गांधींनी न्यायालयात केला आहे. यासंदर्भात सुनावणीनंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

समन ट्रायल नव्हे, समरी ट्रायल

दरम्यान, ‘हे प्रकरण समरी ट्रायल प्रमाणे न चालवता समन्स ट्रायल प्रमाणे चालवावं’, अशी मागणी यावेळी आरएसएसकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात आरएसएसने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. समरी ट्रायलमध्ये पुरावे हे थोडक्यात मांडले जातात. मात्र, समन्स ट्रायलमध्ये विस्तृत स्वरूपात हे पुरावे न्यायालयासमोर ठेवावे लागतात. त्यामुळे ही मागणी आरएसएसकडून लावून धरण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

राहुल गांधींचा दौरा

सकाळीच राहुल गांधी भिवंडी सत्र न्यायालयात दाखल झाले. सुनावणीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. यानंतर, राहुल गांधी गोरेगावच्या नेस्को मैदानात जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर बुधवारी, १३ जून रोजी ते नागपूरला रवाना होतील. या दौऱ्यावर राहुल गांधी एचएमटी तांदळाच्या वाणाचे जनक दिवंगत दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.