अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यात सोमवारी (25 नोव्हेंबर) संध्याकाळी विचित्र अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने पुलाच्या कठड्याला धडक दिली आणि कार थेट ३० फूट खोल नदीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नी यांचा मृत्यू झाला. तर चालक जबर जखमी झाला आहे.
महाडकडून मुंबईच्या दिशेने कार (MH 16 BH 4829) येत होती. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी गावच्या हद्दीत होती. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. तोपर्यंत गाडी पुलावर आली होती. गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य न झाल्याने कारने थेट पुलाच्या कठड्याला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कठडा तोडून कार पुलावरून 30 फूट खोल नदीत कोसळली. यात देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर (अँटॉप हिल, मुंबई) या दाम्पत्याचा जागीचा मृत्यू झाला. तर चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा… Accident News : दारु पिऊन मौजमजा जीवावर बेतली; भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थ आणि क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली. जखमी कारचालकावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी दिली.
(Edited by Avinash Chandane)