घरमुंबईडिलाईल पूल बांधकामाला रेल्वेकडून विलंब, पालिकेच्या कामांवर परिणाम; आदित्य ठाकरेंची नाराजी

डिलाईल पूल बांधकामाला रेल्वेकडून विलंब, पालिकेच्या कामांवर परिणाम; आदित्य ठाकरेंची नाराजी

Subscribe

केंद्रीय मंत्र्यांना आदित्य ठाकरेंनी पत्र पाठवूनही दाद नाही. हिंदमाता भूमिगत जल धारण टाकीच्या कामांची मंत्री आदित्य ठाकरेंकडून पाहणी

डिलाईल पूल प्रकल्पामध्ये पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गिकेवर उड्डाणपूल बांधण्यात होत असलेल्या विलंबाबाबत मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री यांना पत्र पाठवूनही त्यास अद्यापही अपेक्षित उत्तर मिळाले नाही, असे सांगत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेच्‍या ‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ, ना. म. जोशी मार्ग व गणपतराव कदम मार्गावर रेल्वेकडून महत्वाच्या डिलाईल रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी महापालिकेकडूनही पोहोच रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी या ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केली. तसेच, हिंदमाता येथील पावसाळी पाणी साठविण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत जल धारण टाकीच्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली.

यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

तसेच, या पुलाच्या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी रेल्वे मंत्री यांना पत्र पाठवूनही त्यास अद्यापही कोणतेच उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरे काहीसे नाराज झाले आहेत. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरुन येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महापालिका करीत आहे.

तसेच, सदर पुलाच्या कामाबाबत रेल्वेसोबत बैठकाही घेण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून आता ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची वेळ कळवली गेली आहे. मात्र जोपर्यंत रेल्वे प्रशासनाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महापालिकेला पुढील काम हाती घेता येणे शक्य नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणाने रेल्वेच्या कामांना विलंब होतो आहे, ते रेल्वे प्रशासनाने जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच, महापालिकेतर्फे हाती घेतलेल्या पोहोच रस्त्यांसाठी आतापर्यंत आवश्यक काम गतीने करण्यात आले आहे. मात्र रेल्वेने गर्डरचे बांधकाम पूर्ण केले तर महापालिकेचे उर्वरित काम देखील तातडीने पूर्ण होईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी, हिंदमाता येथील पावसाळी पाणी साठविण्यासाठी सेंट झेविअर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत जल धारण टाकीच्या कामाची पाहणी केली. हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे जोरदार पावसाप्रसंगी तेथील सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जल धारण टाकीचे बांधकाम हाती घेतले असून हे काम पूर्णत्वाकडे आहे. या टाकीमध्ये २ कोटी ८७ लाख लीटर पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -