घरताज्या घडामोडीसिंधुदुर्गात पावसाचे थैमान,नद्यांना पूर, २७ गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्गात पावसाचे थैमान,नद्यांना पूर, २७ गावांचा संपर्क तुटला

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस पड़त आहे ,कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर भात शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर अजून कायम राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

कणकवली तालुक्यात गेले दोन तीन दिवस पावसाचा जोर अतिशय वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली शहरातील चोनगेवाडी, नदिपात्रालगत असलेला टेंबवाडीचा भाग पाण्याने वेढला गेला आहे. कणकवली – आचरा रोडही पाण्याखाली गेल्याने बंद झाला आहे. अनेक ठिकाणची वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोरील मार्गावर पाणी आल्याने तिथूनही वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे खारेपाटण मध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सुखनदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे . कणकवली तालुक्याच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने व कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटण गावाला भेट देवून येथील पुरपरस्थितीची पाहणी केली.

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे कणकवली – नरडवे मार्गावरील नाटळ आणि कुंभवडे या दोन गावांच्या सीमेवरील मल्हारी पूल हा दुभंगत चालला आहे. गेले काही दिवस या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता पूल दुभंगण्याच्या स्थितीत असल्याने इतर वाहतूकही पूर्णतः बंदच करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या पुलाच्या स्थितीची योग्य ती दखल घेण्यात यावी आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वैभववाडी तालुक्यातील लोरे येथील शिवगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वैभववाडी – फोंडाघाट वाहतूक बंद झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यना जोड़नारा तिथवली जामदा पुल ही पान्याखाली गेला आहे .वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव व कॉन्स्टेबल जामसंडेकर व इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दोडामार्ग मध्येही सर्व नदी नाले तुडूंब भरुन वाहत असून वझरे,हेवाळे,वानोरी, झरेबांबर कॉज वे पाण्याखाली गेले आहेत .

गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला 25 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे सद्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील तिलारी धरण आणि कर्ली, वाघोटनमधील पाणी पातळीत वाढ होऊन इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज असून सावधानतेचा इशारा दिला आहे. कणकवली येथील गड नदीमधीलही पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काही ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. करुळ आणि भूईबावडा घाट बंद असून फोंडा आणि आंबोली मार्गे अजून वाहतूक सुरू आहे. आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने नागरिकांनी सतर्क रहावे.

अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी तसेच मदतीसाठी 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

 

सिंधुदुर्गात पावसाचे थैमान,नद्यांना पूर, २७ गावांचा संपर्क तुटला
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -