भाजपच्या सत्तेला गेला तडा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र!

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची पीछेहाट झाल्यामुळे सगळीकडेच खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत व्यंगचित्रातून टीका केली.

raj-thackeray
राज ठाकरे (फाईल फोटो)

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. एकंदरीत निकालांची आकडेवारी पाहाता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला असून उर्वरीत दोन्ही राज्यांमध्ये भाजपला विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपवर काँग्रेसने ज्या प्रमाणे आगपाखड केली आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर भाजपची चेष्टा करणारे मीम्स देखील येऊ लागले आहेत. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्राची! नेहमीप्रमाणे आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या कुंचल्यातून भाजपला फटकारे मारले आहेत.

न भरणारा तडा!

राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. यामध्ये सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या नरेंद्र मोदी यांची खुर्ची खालच्या जमिनीला पडलेल्या तड्यामुळे हलल्याचं दिसत आहे. त्यात मागे अमित शाह खुर्ची सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे सत्तेचं प्रतिक असलेले महाल किंवा वाड्याचे खांब कोसळून पडले आहेत. आणि खाली ‘तडा..कधीही भरून न निघणारा’ अशी कॅप्शन टाकलेली आहे. त्याशिवाय डाव्या बाजूला ‘मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाचही राज्यात भाजपचा पराभव’, असं देखील लिहिलं आहे.

Raj Thackeray Cartoon
राज ठाकरेंनी काढलेले व्यंगचित्र

महाराष्ट्राच्या राजकारणात काय?

या निवडणुकांच्या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपला बसलेला हा फटका आगामी निवडणुकांमध्ये मोठा ठरू शकतो. त्यामुळे राज्यातल्या काँग्रेसचाही उत्साह वाढून लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपसमोर काँग्रेस तगडं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी काढलेलं हे व्यंगचित्र सार्थ ठरत असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त केली जात आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – भाजपच्या या पराभवासाठी गुजराती जनतेचे आभार – राज ठाकरे