भिडे वाड्यासाठी राज ठाकरेंची सरकारला विनंती; म्हणाले, रखडलेल्या स्मारकाची अवस्था…

Bhide Wada National Monument | इतर स्मारकांप्रमाणे या स्मारकाच्या कामात दिरंगाई होऊ नये, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसंच, पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल अशा पद्धतीने काम सुरू करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

Bhide Wada National Monument | मुंबई- स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे गोडवे गात असताना त्यांनी ज्या वास्तूतून स्त्री शिक्षणाचा पाया रोवला तो भिडेवाडा मृतावस्थेत आहे. या वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, इतर स्मारकांप्रमाणे या स्मारकाच्या कामात दिरंगाई होऊ नये, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसंच, पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल अशा पद्धतीने काम सुरू करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

हेही वाचा – भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन मुलींची शाळा सुरू करा; भुजबळांची मागणी

राज ठाकरे म्हणाले की, महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडेवाड्यात रोवली. त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा सरकारने ह्या अधिवेशात केली, त्याचं स्वागतच. पण अशा घोषणा पुष्कळदा होतात. पण कृती शुन्य होते हा पूर्वानुभ आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, अजून रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही, ह्याची काळजी घ्या. आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पहा.

पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले होते. शासनाने बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली होती. सरकारनेही त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार, सावित्रीबाईंच्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करून लवकरच त्याचे पुनर्विकास होणार असल्याची ग्वाही सरकारने दिली आहे.