अशी मुंबई यापूर्वी पाहिली नव्हती – राज ठाकरे

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह आख्या जगावर गहिरं होत असताना प्रशासकीय यंत्रणा आणि वेगवेगळी सरकारं त्याविरोधात लढा देण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यामुळे राज्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी मंत्र्यांसोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत देखील चर्चा केली. यावेळी कोरोनाचं संकट रोखण्यासाठी आणि सध्याच्या राज्यातल्या परिस्थितीविषयी आणि त्यावर योजण्याच्या उपाययोजनांविषयी चर्चा झाली. या बैठकीनंतर झालेल्या चर्चेविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांना माहिती दिली. ‘मुंबईची अशी परिस्थिती मी यापूर्वी पाहिली नव्हती. जुन्या सिनेमात पाहिलं होतं’, असं ते म्हणाले.

परप्रांतीयांची नोंदणी करा..

यावेळी राज ठाकरेंनी राज्याबाहेर गेलेल्या परप्रांतीयांची नोंदणी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘मी आधीच म्हणालो होतो की राज्यावर काही संकट आलं तर सगळ्यात आधी हे परप्रांतीय बाहेर जातील. तसंच झालं. आता परप्रांतीयांच्या राज्यातल्या प्रवेशावर आणि राज्यातून बाहेर जाण्यावर बंधनं असायला हवीत. लॉकडाऊननंतर जेव्हा ते पुन्हा राज्यात परततील, तेव्हा त्यांची नोंदणी व्हायला हवी’, असं राज ठाकरे म्हणाले.

एक्झिट प्लॅन काय आहे?

सध्या राज्यात कोरोनाचं संकट असून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पण हा असा लॉकडाऊन कधीपर्यंत सुरू राहणार आहे? लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला. कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याचं उत्तर ना तुमच्याकडे, माझ्याकडे, राज्य किंवा केंद्र सरकारडे, कोणाकडेच नाही, जग चाचपडतंय, आता टीका करुन मोराल डाऊन करु नये, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

कन्टेंन्मेंट झोनमध्ये पोलीस फोर्स वाढवा…

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी राज्यात ज्या ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर झाले आहेत, तिथे पोलीस फोर्स वाढवण्याची मागणी केली. पोलिसांच्या जागी SRPF लावणं याचा अर्थ पोलीस कमी पडले असा नाही. दीड महिना काम करुन पोलिसांवर ताण आला आहे. यामुळे तो कमी होईल, असं राज ठाकरेंनी नमूद केलं. तसेच, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, छोटे दवाखाने सुरु करावेत, MPSC विद्यार्थ्यांना घरी पोहोचवावं, अशा काही सूचना देखील केल्या.