सीबीआयला पैसे परत द्यायला सांगा; राकेश रोशन यांची हायकोर्टात याचिका

सन २०११ मध्ये रोशन यांच्याकडे सीबीआयचे दोन तोतया अधिकारी आले होते. एका तक्रारीत तडजोड करायची आहे. तुम्ही ५० लाख रुपये द्या. आम्ही तडजोड करु, असे त्या अधिकाऱ्यांनी रोशन यांना सांगितले. रोशन यांनी त्या अधिकाऱ्यांना ५० लाख रुपये दिले व त्या प्रकरणात तडजोड करायला सांगितली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोशन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. 

 

मुंबईः अभिनेता व दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सीबीआयविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सीबीआयकडून पैसे परत न मिळाल्याने राकेश रोशन यांनी ही याचिका केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने बुधवारी सीबीआय व राज्य शासनाला नोटीस जारी करुन या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सन २०११ मध्ये रोशन यांच्याकडे सीबीआयचे दोन तोतया अधिकारी आले होते. एका तक्रारीत तडजोड करायची आहे. तुम्ही ५० लाख रुपये द्या. आम्ही तडजोड करु, असे त्या अधिकाऱ्यांनी रोशन यांना सांगितले. रोशन यांनी त्या अधिकाऱ्यांना ५० लाख रुपये दिले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रोशन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला.

रोशन यांची फसवणूक करणाऱ्या बनावट दोन अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली. त्या अधिकाऱ्यांनी अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीबीआयने त्या दोघांकडून सुमारे तीन कोटी रुपये जप्त केले. या रक्कमेत रोशन यांचे ५० लाख रुपयेही होते.

ऑक्टोबर २०१२ मध्ये रोशन यांनी त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला. ९ नोव्हेंबर २०१२ रोजी विशेष सत्र न्यायालयाने रोशन यांना ३० लाख रुपये परत देण्याचे आदेश सीबीआयला दिले. याप्रकरणाचा निकाल लागेपर्यंत रोशन यांनी ५० लाख रुपयांचा नुकसान भरपाई बॉण्ड (indemnity bond) न्यायालयात जमा करावा, असे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले. त्यानुसार रोशन यांनी बॉण्ड भरला.

त्यानंतर २०२० मध्ये रोशन यांनी २० लाख रुपये परत करण्याची मागणी विशेष सत्र न्यायालयात केली. विशेष सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्याविरोधात रोशन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. पैसे परत मिळवण्याचा माझा अधिकार विशेष सत्र न्यायालय नाकारू शकत नाही. तसेच मी ५० लाख रुपयांचा बॉण्ड न्यायालयात भरला आहे. सन २०१२ पासून पैसे सीबीआयच्या ताब्यात आहेत. याप्रकरणाचा खटला अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे माझे उर्वरित पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.