दारू विक्री..राम गोपाल वर्माचं ट्वीट आणि सोना मोहापात्राचा संताप!

ram gopal varma

आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आणि ट्वीट्समुळे नेहमी वादात सापडणारे सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोमवारपासून सरकारने कंटेनमेंट झोन वगळता इतर तिन्ही झोनमध्ये (रेड, ऑरेंज, ग्रीन) दारूची दुकानं सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर या दुकानांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. या रांगेत पुरुषांसोबतच महिला देखील होत्या. त्यावर राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत. महिला देखील पुरुषांप्रमाणेच मद्य खरेदीसाठी रांगेत उभ्या राहण्यावर त्यांनी आक्षेप घेणारं ट्वीट केलं आहे.

राम गोपाल वर्मा म्हणतात, ‘हे बघा वाईन शॉपच्या बाहेर रांगेत कोण दिसतंय. महिलांना दारुड्या पुरुषांपासून वाचवण्यासाठी हे पुरेसं आहे’. लॉकडाऊनच्या काळात आधीच घरगुती हिंसाचारामध्ये मोठी वाढ झालेली असतानाच मद्यविक्रीला परवानगी दिल्यामुळे अशा नशेत असलेल्या पुरुषांकडून महिलांविरोधात अधिक हिंसा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राम गोपाल वर्मा यांनी हे ट्वीट केलं आहे.

मात्र, त्यांच्या या ट्वीटवर त्यांचीच झाडाझडती घेणारे ट्वीट आले आहेत. गायिका सोना मोहपात्राने यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. ‘डिअर मिस्टर आरजीव्ही, ज्या लोकांना खरंच शिक्षणाची गरज आहे, अशांच्या रांगेत तुम्ही जाऊन उभं राहण्याची आता वेळ आली आहे. तुमचं हे ट्वीट लिंगभेद करणारं आणि अनैतिक आहे. महिलांना देखील पुरुषांप्रमाणेच मद्य खरेदी करण्याचा आणि पिण्याचा अधिकार आहे. आणि कुणालाही दारू पिऊन नशेत हिंसक बनण्याचा अधिकार नाही’, असं ट्वीट सोना मोहपात्राने केलं आहे.

याव्यतिरिक्त राम गोपाल वर्मांच्या ट्वीटवर इतर नेटिझन्सनी देखील तोंडसुख घेतलं आहे.