घरCORONA UPDATECoronavirus - सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी रमेश पवारांकडे!

Coronavirus – सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी रमेश पवारांकडे!

Subscribe

महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचा भार सहआयुक्त सुनील धामणे यांच्याकडून काढून घेत उपायुक्त रमेश पवार यांच्या खांद्यावर सोपवला आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई  महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना हाती घेतल्या जात असतानाच महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचा भार सहआयुक्त सुनील धामणे यांच्याकडून काढून घेत उपायुक्त रमेश पवार यांच्या खांद्यावर सोपवला आहे. रमेश पवार यांच्याकडे करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कारभार होता. परंतु मालमत्ता कराची वसुली करण्यात विभागाला अपयश आलेले आहे. त्यातच पवार यांच्याकडून हा अतिरिक्त कारभार काढून सहआयुक्त धामणे यांच्याकडे सोपवल्यामुळे आता वसूल न होणाऱ्या कराचे खापर त्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होईल,अशी चर्चा आहे.

मागील अनेक वर्षांपासून सहआयुक्त सुनील धामणे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. तर महापालिका आयुक्त कार्यालयाचे उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रमेश पवार यांच्याकडे दीड महिन्यांपूर्वीच उपायुक्त (सुधार) आणि  करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कारभार सोपवला होता. मात्र २३ मार्च २०२० रोजी सामान्य प्रशासनाच्यावतीने आयुक्तांच्या आदेशानुसार सहआयुक्त आणि उपायुक्त यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. यामध्ये धामणे यांच्याकडे करनिर्धारण व संकलन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर रमेश पवार यांच्याकडे धामणे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाची अतिरिक्त जबाबदारी  सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

करोनाच्या संदर्भात राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसाठी तसेच रूग्णांना विविध प्रकारची सेवा आणि साहित्य सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त यांना ५ ते १० कोटी रुपये आणि दोन  उपायुक्त यांना १ ते ५ कोटी रुपये तर  केईमचे अधिष्ठाता यांना ५० लाख रुपये आणि सहायक आयुक्त यांना २५ लाख रुपये खर्च करण्याचे अधिकार देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला होता. यामध्ये उपायुक्त रमेश पवार आणि पराग मसुरकर यांना १ ते ५ कोटी रुपये खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे पवार यांच्याकडे आधीच करोनाशी संबंधित आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु आता संपूर्ण आरोग्य विभागाची जबाबदारी पवार यांच्याकडे सोपवून एकप्रकारे त्यांना मालमत्ता कर वसुलीच्या जोखडातून आयुक्तांनी मोकळे केले. करोनाच्या निमित्ताने आयुक्तांनी पवार पवार यांना पेलता न आलेल्या आव्हानातून यानिमित्ताने सुटका केली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांचा सर्व विश्वास हा केवळ रमेश पवार यांच्यावरच असल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -